सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 DIGITAL PUNE NEWS

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; पुण्यात रंगणार ऐतिहासिक साहित्य सोहळा!

गजानन मेनकुदळे    24-11-2026 16:09:47

पुणे : मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरणारी घोषणा झाली असून, शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे मराठी साहित्यविश्वात आनंदाचे आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, शतकमहोत्सवी साहित्य संमेलनाचे आयोजन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात करण्यात येणार आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या शंभराव्या वर्षाचा ऐतिहासिक टप्पा गाठणाऱ्या या सोहळ्याचे अध्यक्षपद डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अध्यक्षपदासाठी रमेश पतंगे, विजयकुमार कोळेकर आणि बाबा भांड यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र, अखेर डॉ. लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

‘अक्करमाशी’ने मराठी साहित्यविश्वाला हादरवणारे वास्तव मांडले

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे नाव मराठी दलित साहित्याच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या ‘अक्करमाशी’ या गाजलेल्या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात मोठी खळबळ उडवून दिली होती. या आत्मकथनातून त्यांनी स्वतःच्या जीवनसंघर्षाबरोबरच समाजातील जातिव्यवस्था, अस्पृश्यता, सामाजिक विषमता, बहिष्कार, उपेक्षा आणि मानवी प्रतिष्ठेसाठीचा संघर्ष अत्यंत परखडपणे मांडला. वंचित समाजाच्या वेदना आणि वास्तवाला त्यांनी आपल्या लेखणीतून प्रभावी शब्द दिले.

लिंबाळे यांचे साहित्य केवळ व्यक्तिगत दुःख किंवा संघर्षापुरते मर्यादित राहत नाही, तर ते समाजव्यवस्थेला प्रश्न विचारते. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि माणसाच्या प्रतिष्ठेचा विचार त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमतेविरोधात आवाज उठवतानाच सर्वसमावेशक, समताधिष्ठित समाजव्यवस्थेची भूमिका त्यांनी आपल्या साहित्यामधून मांडली.

कथा, कादंबरी, आत्मकथन आणि समीक्षेत ठसा

‘अक्करमाशी’ या आत्मकथनासह डॉ. लिंबाळे यांनी कथा, कादंबरी, कविता आणि साहित्यसमीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘हिंदू’, ‘बहुजन’ आणि ‘सनातन’ यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांमधून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वास्तवाचे विविध पैलू समोर आले आहेत. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या त्यांच्या समीक्षात्मक लेखनाने दलित साहित्याच्या वैचारिक मांडणीला महत्त्वपूर्ण दिशा दिली. त्यामुळे त्यांची ओळख केवळ साहित्यिक म्हणून नव्हे, तर सामाजिक वास्तवाचे भान असलेले संवेदनशील विचारवंत म्हणूनही आहे.

शतकमहोत्सवी संमेलनाला सामाजिक समतेच्या विचारांची वैचारिक दिशा

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होत असताना त्याच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची झालेली निवड ही केवळ एका साहित्यिकाचा सन्मान नसून, मराठी साहित्याच्या व्यापक सामाजिक आणि परिवर्तनवादी परंपरेचा गौरव मानला जात आहे. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील विषमता, अन्याय आणि मानवी संघर्ष मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार त्यांच्या लेखनातून सातत्याने अधोरेखित झाला आहे.त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत शतकमहोत्सवी साहित्य संमेलनातून समता, बंधुता, सामाजिक न्याय, मानवी मूल्ये आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा यावर महत्त्वपूर्ण वैचारिक मंथन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मराठी साहित्यविश्वातील या ऐतिहासिक संमेलनाकडे आता राज्यभरातील साहित्यिक, लेखक, वाचक आणि साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती