पुणे : सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील वृक्षतोडीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. भीमाशंकर आणि तारळी परिसरात पंप स्टोरेज वीज प्रकल्पांच्या कामासाठी दुर्मिळ वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा आरोप करत अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित प्रकल्पांचे काम तातडीने थांबवावे, तसेच अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला काळ्या यादीत टाकून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागण्यांसाठी येत्या ३ डिसेंबरला पुण्यात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
सह्याद्रीच्या जैवविविधतेला आणि नैसर्गिक संपत्तीला वीज प्रकल्पांच्या कामामुळे धोका निर्माण होत असल्याचे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे. भीमाशंकर आणि तारळी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून डोंगर पोखरण्याचे काम सुरू असून, या प्रक्रियेत अतिदुर्मिळ वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे, आवश्यक पर्यावरणीय आणि वनविभागाच्या परवानग्यांशिवाय हे काम सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
'अदानी ग्रीन एनर्जी'वर कारवाई करण्याची मागणी
या प्रकरणात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या कामकाजाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासोबतच भीमाशंकर आणि तारळी येथील संबंधित प्रकल्पांचे काम तातडीने बंद करून ते रद्द करावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
विकासकामांना आपला विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली जंगलांचा आणि निसर्गाचा बळी दिला जाऊ नये, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. एकही झाड न तोडता तसेच पर्यावरणाची हानी टाळून वीज प्रकल्प उभारण्याचे पर्याय शोधले पाहिजेत. भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित पर्यावरण मिळणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला कायदेशीर नोटीस
वृक्षतोडीच्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत सयाजी शिंदे यांनी कायदेशीर मार्गाचाही अवलंब केला आहे. संबंधित कंपनीतील दोषींवर कारवाई करण्यात यावी, यासाठी त्यांनी वकिलामार्फत जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला सार्वजनिक कायदेशीर नोटीस बजावली आहे. या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वृक्षतोड थांबवावी, अशी त्यांची मागणी आहे.
३ डिसेंबरला पुण्यात भव्य मोर्चा
सह्याद्रीतील वृक्षसंपत्ती वाचवण्यासाठी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय सयाजी शिंदे यांनी घेतला आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी पुण्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून, तो विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत नेण्यात येणार आहे.
या आंदोलनात राज्यातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि निसर्ग संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. सह्याद्रीतील झाडे, जंगल आणि नैसर्गिक वारसा वाचवण्यासाठी हा लढा असून, पुढील पिढीच्या भवितव्याचा विचार करून प्रत्येकाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ३ डिसेंबरच्या मोर्चाकडे आता पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.