सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 शहर

वकिलांशी बोलून मंदार किवळे कोर्टाबाहेर पडला अन् टोळक्याने गाठलं! गोळीबारानंतर कोयत्याने सपासप वार; वकिलांनी रिक्षाचालकांना हात जोडले, पण...

डिजिटल पुणे    25-11-2026 17:17:51

पुणे : शिवाजीनगर न्यायालयाबाहेर बुधवारी दुपारी घडलेल्या मंदार किवळे हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. न्यायालयातील कामकाज आटोपून वकिलांशी चर्चा केल्यानंतर मंदार किवळे कोर्टाबाहेर पडला आणि काही अंतरावर दबा धरून बसलेल्या सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. आधी गोळीबार आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत हल्लेखोरांनी त्याला गंभीर जखमी केले. या संपूर्ण घटनेचा थरार मंदारच्या वकिलांनी सांगितला असून, जखमी तरुणाला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रिक्षाचालकांना हात जोडून विनंती करावी लागली, तरीही कोणी मदतीसाठी पुढे आले नसल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.

मंदार किवळे (वय ३५) याच्यावर हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारानंतरही जीव वाचवण्यासाठी मंदार धावत होता. मात्र, हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. चेहरा आणि डोक्यावर वार होऊ नयेत म्हणून मंदारने दोन्ही हातांनी डोके झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांच्या सपासप वारांमुळे त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. डाव्या हाताचा पंजा मनगटापासून जवळजवळ वेगळा होऊन लोंबकळत होता. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर मंदार रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला.

जामिनावर सुटल्यानंतर कोर्टात पहिलीच तारीख; बाहेर पडताच हल्ला

मंदार किवळे हा शुभम चव्हाण हत्याप्रकरणातील आरोपी असून, गेल्या दीड वर्षांपासून तो तुरुंगात होता. दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर बुधवारी न्यायालयातील तारखेसाठी तो शिवाजीनगर कोर्टात आला होता. कामकाज पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या वकिलांशी चर्चा केली. त्यावेळी वकिलांनी त्याला तारीख झाल्याचे सांगून घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर मंदार न्यायालयाबाहेर पडला. मात्र, बाहेर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले.

गोळीबार सुरू असताना पोलिसांना सांगितले, पण मदत मिळाली नाही?

मंदारच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या न्यायालय परिसरातून जात असताना काही जण मंदारला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हल्लेखोरांच्या तावडीतून सुटण्यासाठी मंदार धावपळ करत होता. याचदरम्यान एका हल्लेखोराने त्याच्यावर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच वकिलांनी पोलिसांना याची माहिती देत तातडीने कारवाई करण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांकडून हालचाल होईपर्यंत हल्लेखोरांनी मंदारला गाठले आणि त्याच्यावर कोयत्याने वार केले, असा आरोप वकिलांनी केला.

रिक्षाचालकांना हात जोडून विनंती, तरीही मदतीसाठी कोणी पुढे आले नाही!

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मंदार जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना त्याला रुग्णालयात नेण्यासाठी बराच वेळ वाहन उपलब्ध झाले नसल्याचा दावा वकिलांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंदार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना जवळपास १० ते १५ मिनिटे रुग्णवाहिका आली नव्हती. त्यामुळे त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षाचालकांना हात जोडून जखमी तरुणाला रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, एकाही रिक्षाचालकाने मदतीसाठी प्रतिसाद दिला नाही, असे त्यांनी सांगितले.

'मंदार आरोपी असला तरी तो आधी माणूस आहे. त्याच्यावर हल्ला होत असताना त्याला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. गोळीबार सुरू असतानाही पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नाही,' अशा शब्दांत वकिलांनी संताप व्यक्त केला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मंदार गर्दीकडे पाहत होता...

हल्लेखोरांनी केलेल्या वारांमुळे मंदारची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर मंदार कसाबसा उठून रस्त्याच्या पलीकडे गेला. मात्र, काही क्षणांतच तो पुन्हा खाली कोसळला. शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्याला उठण्याचेही त्राण उरले नव्हते. तो रस्त्यावर पडून केवळ डोळ्यांची उघडझाप करत सभोवताली जमलेल्या लोकांकडे पाहत होता. घटनास्थळावरील हे दृश्य उपस्थितांच्या अंगावर काटा आणणारे होते.

दरम्यान, न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही हल्लेखोर शस्त्रांसह आतापर्यंत कसे पोहोचले आणि भरदिवसा हा हल्ला कसा घडला, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


 Give Feedback



 जाहिराती