सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 जिल्हा

एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती सादर करा!

डिजिटल पुणे    25-11-2026 17:26:41

मुंबई  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या विविध वृत्तांच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकल्पाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत राबविण्यात आलेल्या सर्व प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रियेची माहिती तसेच संबंधित कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत.

एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत, निविदा प्रक्रियेबाबत तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीच्या निवडीबाबत प्रसारमाध्यमांमधून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया नेमक्या कोणत्या पद्धतीने राबविण्यात आली, त्यासाठी कोणते प्रशासकीय व तांत्रिक निकष निश्चित करण्यात आले होते, निविदा प्रसिद्धीपासून अंतिम कंत्राट मंजुरीपर्यंत कोणकोणते टप्पे पार पडले आणि संबंधित कंपनीची निवड कोणत्या आधारावर करण्यात आली, याची वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले आहे.

त्यानुसार, निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत घेण्यात आलेले निर्णय व प्रशासकीय मान्यतेचे आदेश, निविदेतील अटी-शर्ती, तांत्रिक व आर्थिक पात्रतेचे निकष, निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व कंपन्यांचे देकार (Bids), त्यांची तुलनात्मक माहिती, तांत्रिक छाननी व आर्थिक मूल्यमापनाचे अहवाल, निविदा मूल्यांकन समितीचे इतिवृत्त, संबंधित कंपनीच्या निवडीसाठी अवलंबिण्यात आलेले निकष आणि अंतिम निवडीसंबंधीचे निर्णय आदी कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

याशिवाय निविदा मंजुरी, कार्यादेश, करारनामा, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भातील दस्तऐवज, स्मार्ट कार्डची किंमत निश्चित करण्याची प्रक्रिया, महामंडळ आणि संबंधित कंपनी यांच्यातील आर्थिक व्यवहारांचे स्वरूप, महसूलविषयक अटी तसेच या प्रकल्पासंदर्भातील पत्रव्यवहार, प्रशासकीय मान्यता आणि संचालक मंडळाचे ठराव यांचीही माहिती मागविण्यात आली आहे.

प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याची पारदर्शकता तपासणार!

एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रकल्पाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट करण्यावर भर दिला आहे. मागविण्यात आलेली सर्व माहिती कोणतीही दिरंगाई न करता संकलित करून, संबंधित कागदपत्रांसह आणि आपल्या स्पष्ट अभिप्रायासह अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती