मुंबई : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांविषयी आवड निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६ ला अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी भेट दिली. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित या महोत्सवात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी बोलताना गौतम अदानी म्हणाले की, मुंबई बुक फेस्टिव्हलमधील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानार्जनाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम हा अभिनव दृष्टिकोन आहे. या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. लहान मुलांसह प्रत्येक नागरिकाने पुस्तकांचा अधिकाधिक वापर करावा, पुस्तकांचे वाचन करावे आणि त्यातून नवनवीन गोष्टी शिकून घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
या भेटीदरम्यान गौतम अदानी यांनी महोत्सवातील विविध दालनांची पाहणी केली. तसेच लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’ला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील देशपांडे, उद्योगपती मोहित कंबोज-भारतीय, ‘मुंबई पुस्तक महोत्सव’चे आयोजक आमदार अमित साटम, ‘मुंबई पुस्तक महोत्सव’चे संयोजक आचार्य पवन त्रिपाठी आणि ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल उपस्थित होते.