पुणे : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. राजगुरुनगरजवळील राक्षेवाडी येथे एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा तोल गेल्याने हा अपघात झाला. यावेळी दुचाकीवर मागे बसलेली तरुणी थेट एसटी बसच्या चाकाखाली आली. या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. सोनाली कोळेकर असे मृत तरुणीचे नाव असून, या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली कोळेकर ही खेड तालुक्यातील भोमाळे गावची रहिवासी होती. एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी ती राक्षेवाडी परिसरात राहत होती. मंगळवारी सायंकाळी ती दुचाकीवरून प्रवास करत असताना राक्षेवाडीतील गणेश मंदिरासमोर हा अपघात घडला.
यावेळी दुचाकीस्वार एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अरुंद रस्ता आणि वाहनांची गर्दी यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. परिणामी दुचाकी रस्त्यावर कोसळली. यावेळी मागे बसलेली सोनाली रस्त्यावर पडून एसटी बसच्या चाकाखाली आली. बसचे चाक अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
रस्त्यावरील अतिक्रमण आणि पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या दुर्घटनेनंतर राक्षेवाडीतील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. परिसरातील अरुंद रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणारी अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी दुकानांसमोर पत्र्याचे शेड उभारण्यात आले असून, रस्त्यालगत साहित्य ठेवल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा आणखी कमी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवून अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी, तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, एका तरुणीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सोनालीचे अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.