सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 क्राईम

पुणे कोर्ट हल्ला प्रकरणात मोठी कारवाई; पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमधून जेरबंद

डिजिटल पुणे    25-11-2026 19:27:45

पुणे : शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मंदार किवळे याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचा कट रचल्याचा संशय असलेल्या अक्षय चव्हाण आणि अमोल चव्हाण या दोघांना पुण्यातून पकडण्यात आले, तर प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या अन्य तीन आरोपींना दौंड परिसरातून अटक करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

बुधवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ जवळ ही धक्कादायक घटना घडली होती. न्यायालयातील कामकाज आटोपून बाहेर पडलेल्या मंदार किवळे याला दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी लक्ष्य केले. सुरुवातीला आरोपींनी पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळ्या न सुटल्याने त्यांनी कोयत्याने मंदारवर सपासप वार केले. भरदिवसा आणि न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. हल्लेखोर दौंडमार्गे सोलापूरच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर संबंधित मार्गावरील पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आणि विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी दौंड परिसरात संशयित आरोपींच्या वाहनाचा माग काढला. वाहनाचा पाठलाग करून ते अडवण्यात आले आणि त्यातून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. दुसरीकडे, या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या अक्षय चव्हाण आणि अमोल चव्हाण यांनाही पुण्यातून पकडण्यात आले. अशा प्रकारे या प्रकरणात एकूण पाच जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.

शुभम चव्हाण हत्या प्रकरणातून हल्ल्याचे धागेदोरे?

मंदार किवळे याच्यावर झालेल्या हल्ल्यामागे जुन्या वैमनस्याची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मंदार हा २०२५ मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी असून, काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. याच प्रकरणातील जुन्या वादातून किंवा शुभम चव्हाणच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मंदार किवळेची प्रकृती गंभीर

या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील आणि वर्दळीच्या परिसरात पिस्तूल व कोयत्यांसारखी शस्त्रे घेऊन हल्लेखोर पोहोचल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या पाचही संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे. हल्ल्याचे नेमके नियोजन कुठे झाले, प्रत्यक्ष हल्ल्यात कोणाची काय भूमिका होती, तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. चौकशीतून या हल्ल्यामागील संपूर्ण कट आणि त्यामागील कारणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती