पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात मंदार किवळे याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ल्यामध्ये तब्बल १५ जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हल्लेखोरांनी मंदारवर धारदार शस्त्रांनी वार केले, तसेच गोळीबारही केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदारवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवारी (२५ नोव्हेंबर) रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. रामचंद्र चव्हाण, गणेश चव्हाण, ऋषिकेश कोंडे, ओंकार ऊर्फ बाब्या पवार आणि प्रथमेश येनपुरे यांच्यासह चार अनोळखी व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वादातून आणि पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर येत आहे.
दौंड, डेक्कन आणि आंबेगावमधून आरोपींना अटक
हल्ल्यानंतर पसार झालेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विविध ठिकाणी पथके रवाना केली होती. या कारवाईत दौंड तालुक्यातून चार, डेक्कन परिसरातून दोन आणि आंबेगावमधून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्या आरोपींमध्ये अक्षय सुभाष चव्हाण, अमोल रामचंद्र चव्हाण, स्वप्निल बाजीराव गवळी, ओंकार संतोष पवार, सूरज साधू माळेकर आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
पोलिसांनी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडी जप्त केली आहे. याशिवाय दोन पिस्तुले आणि कोयतेही हस्तगत करण्यात आले आहेत. या हल्ल्याचे नियोजन कोणी केले, आरोपींना शस्त्रे कोणी पुरवली आणि या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.
१५ जणांच्या सहभागाचा संशय; तपासाची व्याप्ती वाढली
मंदार किवळे याच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांना आहे. प्रत्यक्ष हल्ल्यात किती जण सहभागी होते आणि पडद्यामागून या हल्ल्याचे नियोजन करणारे कोण होते, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात एकूण १५ जण सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके तपास करत आहेत.
शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हल्ला?
या संपूर्ण प्रकरणाला २० एप्रिल २०२५ रोजी कात्रज परिसरात झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शुभम चव्हाण याच्या हत्येचा राग मनात धरून मंदार किवळे याच्यावर हल्ला करण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे.
शुभम चव्हाण हत्या प्रकरण आणि मंदार किवळे हल्ला प्रकरण यांच्यातील संभाव्य संबंध तपासण्यासाठी पोलिसांकडून महत्त्वाचे धागेदोरे जोडले जात आहेत. जुन्या वादातून हा हल्ला झाला की त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा उलगडा तपासातून होणार आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.