पुणे : पुणे शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत सर्वसामान्यांसह राजकीय पदाधिकारी आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे फ्लेक्सही चर्चेत आले आहेत. सुरुवातीला स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांना 'शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६' जाहीर झाल्यानंतर आता थेट महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अनधिकृत फ्लेक्सचा मुद्दा समोर आला आहे. महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या फ्लेक्सचा फोटो पोस्ट करत प्रशासनाने महापौरांनाच मिश्किल टोला लगावला आहे.
महापौर मंजुषा नागपुरे यांच्या नावाने लावण्यात आलेल्या एका बॅनरचा फोटो पुणे महापालिकेच्या अधिकृत 'एक्स' (X) हँडलवर प्रसिद्ध करण्यात आला. या बॅनरवर 'ड्रेनेजच्या तसदीबद्दल क्षमस्व' असा मजकूर लिहिण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना प्रशासनाने 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची तसदी कशाबद्दल?' असा सवाल उपस्थित केला. महापालिकेच्या या पोस्टमुळे स्वतःच्याच महापौरांच्या फ्लेक्सवरून प्रशासनाने त्यांना घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, महापौरांपुरतीच ही मोहीम मर्यादित राहिलेली नाही. काँग्रेसचे गटनेते रामचंद्र ऊर्फ चंदू कदम यांच्या फ्लेक्सचाही फोटो प्रशासनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फ्लेक्सवर 'आम्हाला पाहिजे क्लस्टर योजना, आम्ही नागरिकांच्या सोबत' असा मजकूर होता. त्यावर 'आम्ही नागरिकांच्या सोबत हो, फोटोही नागरिकांनीच पाठवला,' अशी उपरोधिक टिप्पणी करण्यात आली. यापूर्वी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या फ्लेक्सबाबतही प्रशासनाने अशाच प्रकारची पोस्ट केली होती.
'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद
शहरातील चौक, रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस, नियुक्त्या, स्वागत समारंभ तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स लावले जातात. त्यामुळे पुण्याच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात होत्या. याला आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेने २४ नोव्हेंबर २०२६ रोजी 'भाऊ फ्लेक्स काढा' ही डिजिटल मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेसाठी bhauflexkadha.pmc.gov.in हे स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना शहरातील अनधिकृत फ्लेक्सचे फोटो अपलोड करून त्याचे ठिकाण नोंदवता येते. त्यानंतर संबंधित विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून तक्रारींच्या आधारे कारवाई केली जाणार आहे. मोहिमेच्या पहिल्या दोन दिवसांत ७६४ नागरिकांनी फ्लेक्सचे फोटो अपलोड करून तक्रारी नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांची नावे पुरस्कार यादीत
महापालिकेने या उपक्रमांतर्गत 'शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६' हा स्वतंत्र विभाग तयार केला आहे. यामध्ये 'ब्रँड्स' आणि 'माननीय' असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. अनधिकृत फ्लेक्सच्या प्रकरणात पहिल्या टप्प्यात स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि सुनील पांडे या भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. तर ब्रँड्सच्या गटात ब्रह्मप्रिया वर्ल्ड स्कूल, आर जीज बिर्याणी आणि शांतिप्रिया/शांती शिखर यांचा समावेश करण्यात आला आहे.
राजकीय पदाधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का?
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींचेच फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी झळकत असल्याने या मोहिमेच्या निमित्ताने राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेने सोशल मीडियावरून थेट लोकप्रतिनिधींच्या फ्लेक्सकडे लक्ष वेधल्याने या उपक्रमाची चर्चा अधिक रंगली आहे. मात्र, केवळ फोटो पोस्ट करण्याऐवजी संबंधितांवर प्रत्यक्ष दंडात्मक कारवाईही होणार का, तसेच सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वांनाच समान नियम लागू होणार का, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.