सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कर्जबाजारी शेतकऱ्यांना तगादा लावू नका, अन्यथा जेलमध्‍ये जाल, फायनान्‍स कंपन्‍यांना एकनाथ शिंदेंचा इशारा, म्हणाले, जे काम कोणी करत नाही ते मी करतो
  • मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचं पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
  • 'पाकिस्तानी कंटेंटला भारतात थारा नाही!' पाकच्या 'या' वेबसीरिजवरून केंद्र सरकारनं नेटफ्लिक्सला सुनावलं; भारतात रिलीजवर बंदी
  • शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
  • पुणे महापालिकेचा महापौरांना घरचा आहेर; अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाचा टोला
 जिल्हा

उजनी धरण परिसरासह पंढरपूर भागात मत्स्य बाजार उभारणीला गती ;मत्स्यबाजारांचे प्रस्ताव महिनाभरात सादर करण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

डिजिटल पुणे    26-11-2026 12:38:26

मुंबई : उजनी धरणाजवळील प्रेमनगर, पंढरपूर आणि पंढरपूर-माळशिरस सीमेवरील बंधाऱ्यालगत अशा तीन ठिकाणी मत्स्यबाजार उभारण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत सविस्तर प्रस्ताव महिनाभरात सादर करावेत. मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी समन्वयाने प्रस्ताव तयार करावेत. स्थानिक आमदारांसमवेत प्रस्तावांचा आढावा घेऊन त्यांच्या मान्यतेनंतर ते शासनाकडे पाठवावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक मासळी बाजारपेठ उभारण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार अभिजित पाटील, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, सोलापूर जिल्हाधिकारी (ऑनलाइन) तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उजनी धरणातील गोड्या पाण्यात टिकू शकणाऱ्या नव्या मत्स्यप्रजातींची वाढ आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र संकल्पना तयार करण्याची मागणी आमदारांनी बैठकीत मांडली. मत्स्योत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

उजनी धरणाच्या भिंतीजवळील प्रेमनगर परिसरात सोलापूर-पुणे महामार्गालगत सध्या मत्स्यविक्री होते. या ठिकाणी स्वतंत्र बाजार उभारल्यास स्थानिक मच्छीमार आणि विक्रेत्यांना निश्चित विक्रीस्थळ उपलब्ध होणार आहे. पंढरपूरमध्ये चंद्रभागा मत्स्यमारी संस्थेने भाडेतत्त्वावरील मर्यादित जागेत बाजार सुरू केला असून, सुमारे २०० ते २२५ मच्छीमारांना गटागटाने वेगवेगळ्या दिवशी व्यवसाय करावा लागतो. पंढरपूर-माळशिरस सीमेवरील बंधाऱ्यालगतही मोठ्या संख्येने मच्छीमार कुटुंबे व्यवसाय करतात.

या वेळी श्री. राणे यांनी तिन्ही ठिकाणच्या मच्छीमार आणि विक्रेत्यांच्या गरजा जाणून घेऊन स्वतंत्र आराखडे तयार करण्यास सांगितले. अधिकाऱ्यांना तिन्ही प्रस्तावित स्थळांची पाहणी करून संबंधित जागा ग्रामपंचायत, मत्स्य संस्था अथवा अन्य विभागाच्या मालकीची असल्यास आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे घेऊन प्रस्ताव पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले.

आमदारांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील मत्स्यबाजारासाठी सुमारे तीन कोटी रुपये, तर नगरपालिका क्षेत्रातील बाजारासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची प्राथमिक गरज मांडली. तीन कोटी रुपयांच्या प्रकल्पातील २५ टक्के हिस्सा ७५ लाख रुपये होतो. हा हिस्सा तसेच उर्वरित निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीसह उपलब्ध पर्याय तपासण्याची सूचना मंत्र्यांनी केली.तांत्रिक अडचणी असल्यास मत्स्यव्यवसाय आयुक्त आणि मंत्रालयाशी तत्काळ संपर्क साधावा. डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाठपुराव्यासाठी बैठक घेऊन प्रस्तावांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असे श्री. राणे यांनी या वेळी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती