पुणे: पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व यशवंतराव चव्हाण सेंटर पुणे जिल्हा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त संविधान स्तंभाला मानवंदना देऊन संविधान उद्देशिका वाचन केले व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.लोकनेते शरदचंद्र पवार बहुद्देशीय भवन(धनकवडी) येथे हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर रोजी सकाळी झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष डॉ.विशाल तांबे,नगरसेविका वर्षा तापकीर,वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री काथवटे ,वैद्यकीय अधिकारी डॉ.परिमल भोसले,स्व.विलासराव तांबे आरोग्य दवाखान्या चे कर्मचारी, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणारे आरोग्य निरीक्षक,स्वच्छ संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.विशाल तांबे म्हणाले,'सर्व भारतीयांना समान न्याय ,हक्क ,अधिकार व दर्जा देणारे आपले संविधान ही आपल्यासाठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परीश्रम करुन लिहिलेले संविधान आजच्याच दिवशी संविधान सभेने स्वीकारले. समता-स्वातंत्र्य-बंधुता या मूल्यांवर देश चालविण्याचा मंत्रही दिला.अशा या संविधानाचे स्मरण सतत डोळ्यासमोर असावे या हेतूने खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुद्देशीय भवनाच्या दर्शनी भागात आपण संविधान स्तंभ उभारला. याचे लोकार्पण लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. या संविधान स्तंभाच्या साक्षीने संविधानाची शिकवण पुढे नेली पाहिजे'