सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कर्जबाजारी शेतकऱ्यांना तगादा लावू नका, अन्यथा जेलमध्‍ये जाल, फायनान्‍स कंपन्‍यांना एकनाथ शिंदेंचा इशारा, म्हणाले, जे काम कोणी करत नाही ते मी करतो
  • मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचं पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
  • 'पाकिस्तानी कंटेंटला भारतात थारा नाही!' पाकच्या 'या' वेबसीरिजवरून केंद्र सरकारनं नेटफ्लिक्सला सुनावलं; भारतात रिलीजवर बंदी
  • शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
  • पुणे महापालिकेचा महापौरांना घरचा आहेर; अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाचा टोला
 जिल्हा

लोणी काळभोरपासून शिरूरपर्यंत पोलिसांचा थरारक पाठलाग! कारमधून २५० किलो गांजा जप्त; दोघे ताब्यात

डिजिटल पुणे    26-11-2026 17:34:36

पुणे : पोलिसांनी थांबविण्याचा इशारा देताच वेगाने पळ काढलेल्या कारचा लोणी काळभोरपासून शिरूरपर्यंत पाठलाग करत अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. संशयित महिंद्रा एक्सयूव्ही ७०० कारची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल २५० किलो गांजा आढळून आला. या प्रकरणी दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गांजा, कार आणि मोबाईलसह एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २५) अमली पदार्थ विरोधी पथक-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने हे आपल्या पथकासह लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी कुंजीर लॉन्स परिसरातून राखाडी रंगाची महिंद्रा एक्सयूव्ही कार वेगाने जाताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी चालकाला कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र, त्याने थांबण्याऐवजी कार सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात नेली.

चालकाच्या संशयास्पद वर्तनामुळे पोलिसांनी तातडीने कारचा पाठलाग सुरू केला. ही कार यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पुढे शिरूरच्या दिशेने गेली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी गुन्हे शाखेसह संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला. त्यानंतर विविध पथकांनी समन्वय साधत शिरूर शहरात कारला घेराव घालून ताब्यात घेतले.

दरम्यान, पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी कारमधील दोघांनी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून स्टेट बँक कॉलनीतील दत्त मंदिराजवळ, सत्यमाना निवास इमारतीसमोरील मोकळ्या जागेत दोघांनाही पकडले.

समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४, रा. सांगोळा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) आणि मयूर जगदीश मोहिते (वय ३०, रा. जागापूर, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याचे उघड झाले. तपासणीत तब्बल २५० किलो गांजा जप्त करण्यात आला.

या कारवाईत गांजा, महिंद्रा एक्सयूव्ही ७०० कार आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त गीहर हसन तसेच सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे आणि शंकर सटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक आणि अमली पदार्थ विरोधी पथक-२ मधील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. यवत आणि शिरूर पोलिसांनीही कारवाईसाठी सहकार्य केले.


 Give Feedback



 जाहिराती