सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • डिलिमिटेशन विधेयक हाणून पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करु, पक्षाच्या बैठकीत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य
  • बदलापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत! जीव वाचवण्यासाठी पळालेल्या १८ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
  • संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू
  • मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
  • पुण्यात १५ ऑगस्ट चौकात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
 जिल्हा

बदलापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत! जीव वाचवण्यासाठी पळालेल्या १८ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

डिजिटल पुणे    27-11-2026 16:02:01

मुंबई : बदलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी धावत सुटलेल्या एका १८ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हर्षल शिंदे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल शिंदे हा आपल्या मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेकडील शनिनगर परिसरात गेला होता. मित्रांना सोडण्यासाठी गेलेला असताना परिसरात एका महिलेकडून भटक्या कुत्र्यांना अन्न दिले जात होते. त्याचवेळी तेथील एक भटका कुत्रा हर्षल आणि त्याच्या मित्रांच्या मागे लागला. कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी हर्षलने घाबरून वेगाने धाव घेतली. त्यानंतर त्याने जवळच असलेल्या एका दुकानात आश्रय घेतला. मात्र, धावत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेनंतर हर्षलला बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, हर्षलवर तीन वर्षांपूर्वीच हृदयाची बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कुत्र्याच्या भीतीने जीवाच्या आकांताने धावताना हृदयावर ताण आल्याने त्याला झटका आल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे बदलापूरमधील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. नगरपालिका प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेची दखल घेत नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे.

बदलापूर शहरात तब्बल १५ हजार भटकी कुत्री

बदलापूर शहरात सध्या सुमारे १५ हजार भटकी कुत्री असल्याची माहिती समोर आली आहे. शहरात कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. नगरपालिका प्रशासनाने डॉग शेल्टरच्या माध्यमातून उपाययोजना सुरू केल्या असल्या, तरी एवढ्या मोठ्या संख्येतील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्याची गरज आहे. हर्षलच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत असून, आणखी किती नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागणार, असा संतप्त सवाल स्थानिकांकडून केला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती