मुंबई : महाराष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य, कुशल मनुष्यबळ, वेगाने विस्तारणारी बाजारपेठ आणि वैविध्यपूर्ण औद्योगिक परिसंस्था यामुळे जर्मनीच्या लोअर सॅक्सोनी राज्यातील उद्योगांसाठी राज्यात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जर्मन उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादनासह संशोधन आणि विकास केंद्रे उभारून जगभरातील बाजारपेठांना सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.लोअर सॅक्सोनीचे मंत्री-अध्यक्ष ओलाफ लाईस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासमवेत वर्षा निवासस्थानी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उभय राज्यांतील सहकार्याचा कृती आराखडा मांडला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भागीदारीला ठोस स्वरूप देण्यासाठी वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेला ‘महाराष्ट्र-लोअर सॅक्सोनी संयुक्त कार्यगट’ स्थापन करावा. महाराष्ट्र आणि लोअर सॅक्सोनी या दोन्ही राज्यांची एकत्रित अर्थव्यवस्था सुमारे एक ट्रिलियन अमेरिकी डॉलरची आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा सुमारे १५ टक्के वाटा असून, देशातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या जवळपास एक तृतीयांश गुंतवणूक राज्य आकर्षित करत आहे. महाराष्ट्राने २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मुंबईतील वित्तीय आणि तंत्रज्ञान परिसंस्था, पुण्यातील वाहन व अभियांत्रिकी उद्योग, नागपूरची दळणवळण आणि औद्योगिक क्षमता तसेच नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील उत्पादन समूह राज्याच्या आर्थिक विकासाला गती देत आहेत. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि आगामी वाढवण बंदरामुळे जागतिक मूल्यसाखळी व निर्यात केंद्र म्हणून महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट होईल. राज्य शासन पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, शिक्षण आणि मनुष्यबळ विकासात मोठी गुंतवणूक करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रगत उत्पादन आणि भविष्यकालीन वाहन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फोक्सवॅगन हा महाराष्ट्र आणि लोअर सॅक्सोनीमधील महत्त्वाचा औद्योगिक दुवा आहे. राज्य शासनाने चाकण येथील उत्पादन सुविधांचे आधुनिकीकरण तसेच इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनांसाठी नव्या गुंतवणूक कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राला वाहन उत्पादन, अभियांत्रिकी, उत्पादन विकास, चाचणी आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनविण्याचा राज्याचा मानस आहे. अचूक अभियांत्रिकी, औद्योगिक स्वयंचलन, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, बॅटरी, एरोस्पेस आणि औद्योगिक कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांतही सहकार्याच्या व्यापक संधी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
हरित ऊर्जा आणि औद्योगिक परिवर्तनासाठी लोअर सॅक्सोनीचे पवनऊर्जा, हरित हायड्रोजन, बॅटरी तंत्रज्ञान आणि कमी कार्बन उत्सर्जनाच्या पोलाद उत्पादनातील कौशल्य महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल. महाराष्ट्राने २०४७ पर्यंत ऊर्जा मिश्रणात हरित ऊर्जेचा वाटा ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हरित हायड्रोजन आणि त्यावर आधारित उत्पादनांचे जागतिक उत्पादन व निर्यात केंद्र होण्यासाठीही राज्य प्रयत्नशील आहे. हरित पोलाद, औद्योगिक कार्बनमुक्ती, ऊर्जा साठवणूक, हरित अमोनिया आणि शाश्वत इंधन क्षेत्रांत संयुक्त प्रकल्प राबविता येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जर्मन भाषा प्रशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, पात्रता मान्यता आणि पारदर्शक भरतीसाठी दोन्ही राज्यांनी संयुक्त कार्यक्रम विकसित करावेत, अशी भूमिकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.
नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटीमध्ये लोअर सॅक्सोनीतील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योगांनी सहभागी व्हावे. संयुक्त संशोधन कार्यक्रम, दुहेरी पदवी अभ्यासक्रम, उद्योगाभिमुख शिक्षण, विद्यार्थी देवाणघेवाण आणि महाराष्ट्रात शैक्षणिक संकुले स्थापन करण्यासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
लोअर सॅक्सोनीचे मंत्री-अध्यक्ष ओलाफ लाईस म्हणाले, महाराष्ट्राशी आर्थिक सहकार्य अधिक व्यापक आणि सखोल करणे हे या दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. वाहन उद्योग, संरक्षण व सुरक्षा तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, बांधकाम आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांत दोन्ही राज्यांमध्ये मोठी क्षमता आहे. सध्याच्या गुंतवणुकीला बळ देतानाच उद्योग, संशोधक आणि नागरिकांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.फोक्सवॅगनने २००१ पासून महाराष्ट्रात सुमारे १.१ अब्ज युरोची गुंतवणूक केली आहे. राज्यातील कंपनीच्या दोन उत्पादन प्रकल्पांची एकत्रित वार्षिक क्षमता तीन लाख १५ हजार वाहनांची असून, तेथे चार हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीने संशोधन आणि विकास क्षेत्रातील अभियंत्यांची संख्या ४५० वरून ७०० पेक्षा अधिक करण्याचे नियोजन केले आहे. भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींच्या यशस्वी निष्पत्तीमुळे बाजारपेठ प्रवेश, अतिरिक्त गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील, असे लाईस यांनी सांगितले.
लोअर सॅक्सोनीमधील संरक्षण प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील संरक्षण उद्योगांच्या प्रतिनिधींना तसेच हॅनोव्हर येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक व्यापार मेळ्यासाठी राज्याच्या व्यावसायिक शिष्टमंडळाला लाईस यांनी निमंत्रित केले.यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अनबलगन पी., मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, जर्मनीचे भारतातील कॉन्सिलेट जनरल क्रिस्टोफ हॅलियर, लोअर सॅक्सनीचे राज्य संसद हन्ना नाबर, क्रिस्टोफ ब्रॅटमॅन, ॲन-फ्रेडरिके कुरा, मार्सेल शारेलमन तसेच लोअर सॅक्सनी चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्सचे अधिकारी उपस्थित होते.