सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • डिलिमिटेशन विधेयक हाणून पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करु, पक्षाच्या बैठकीत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य
  • बदलापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत! जीव वाचवण्यासाठी पळालेल्या १८ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
  • संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू
  • मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
  • पुण्यात १५ ऑगस्ट चौकात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
 जिल्हा

औरंगजेबाच्या दक्षिणेतील मोहिमेला महाराणी ताराराणी यांनी दिलेला प्रतिकार हा मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा – मेधा देशमुख-भास्करन

डिजिटल पुणे    27-11-2026 18:15:21

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभरणी करण्याबरोबरच दूरदृष्टीने किल्ल्यांची आणि संरक्षण व्यवस्थेची उभारणी केली. दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेतून त्यांनी भविष्यातील संघर्षासाठी संरक्षणाची महत्त्वपूर्ण व्यवस्था निर्माण केली. त्यांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्षे मुघल सत्तेविरुद्ध संघर्ष केला. त्यानंतर औरंगजेबाच्या दीर्घकालीन दक्षिणेतील मोहिमेला महाराणी ताराराणी यांनी दिलेला प्रतिकार हा मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ मेधा देशमुख-भास्करन यांनी स्पष्ट केले.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सव-२०२६ अंतर्गत ‘स्वराज्य आणि राज्यकारभार’ या विषयावर त्यांचा विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता. इतिहासकार वर्षा मुळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न, छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष आणि महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाविरुद्ध उभारलेला लढा हा मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्याय आहे. या तीन पिढ्यांच्या नेतृत्वाचा, लष्करी रणनीतीचा आणि राज्यकारभाराचा वेध घेत मेधा देशमुख-भास्करन यांनी इतिहासाचे विविध पैलू उलगडले.

नेपोलियन बोनापार्ट यांच्यावर इंग्रजीत अनेक पुस्तके उपलब्ध असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य सांगणारे पुस्तक लिहिण्याची आवश्यकता त्यांना जाणवली. त्यातून ऐतिहासिक लेखनप्रवासाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समजून घेण्यासाठी तत्कालीन मुघल साम्राज्याचा आणि औरंगजेबाच्या सत्तेचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. इतिहासातील व्यक्तिमत्त्वांचे कार्य समजून घेताना त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि लष्करी परिस्थितीचाही सखोल अभ्यास करावा लागतो. याच अभ्यासातून छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर महाराणी ताराराणी यांच्या कार्याचा वेध घेण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाविषयी बोलताना त्यांनी त्यांच्या रणनीतीचे वेगळेपण अधोरेखित केले. औरंगजेबाच्या प्रचंड सामर्थ्याला सामोरे जाताना महाराणी ताराराणी यांनी केवळ लष्करी सामर्थ्यावर अवलंबून न राहता मानसिक युद्धनीतीचाही प्रभावी वापर केला. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी संघर्षाची नवी दिशा निर्माण केली, असे त्यांनी सांगितले.

इतिहास आणि ऐतिहासिक कादंबरी लेखनातील फरक स्पष्ट करताना मेधा देशमुख-भास्करन म्हणाल्या की, इतिहासकार घटनांची तारीख, काळ आणि संदर्भ नोंदवतात; मात्र कादंबरी लिहिताना त्या काळातील व्यक्तींच्या मनातील विचार, त्यांची देहबोली, संवाद, स्वभाववैशिष्ट्ये आणि निर्णयप्रक्रिया यांचा वेध घ्यावा लागतो. ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून त्या व्यक्तिमत्त्वांचे जीवन वाचकांसमोर जिवंतपणे उभे करण्याचा प्रयत्न करावा लागतो.

महाराणी ताराराणी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे लेखन करताना तत्कालीन सामाजिक परिस्थिती, स्त्रियांचे स्थान, राजघराण्यातील जीवन आणि नेतृत्वातील त्यांची भूमिका यांचा अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे स्वभावचित्र रेखाटताना मानवी स्वभावातील विविध पैलू समजून घेणेही महत्त्वाचे ठरते, असे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या जीवनकार्यावर आधारित त्यांच्या पुस्तकांचे मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असलेले लेखन वाचकांसाठी इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे ठरत आहे. विशेषतः महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक कादंबरीच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाचा आणि संघर्षाचा वेध घेण्यात आला आहे.

इतिहास केवळ घटनांचा क्रम नसून त्या घटनांमागील विचार, नेतृत्व, सामाजिक परिस्थिती आणि मानवी अनुभव समजून घेण्याचे माध्यम आहे, हा विचार या संवादातून अधोरेखित झाला. ऐतिहासिक लेखनाच्या माध्यमातून नव्या पिढीला मराठ्यांचा गौरवशाली इतिहास अधिक जवळून समजून घेण्याची संधी मिळत असल्याचे या संवादातून स्पष्ट झाले.


 Give Feedback



 जाहिराती