पुणे : शहरातील अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्सविरोधात पुणे महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे समर्थन करताना, उद्या आपल्या नावाचेही बेकायदा होर्डिंग आढळल्यास पुरस्कारांच्या यादीत आपले नाव समाविष्ट करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच नागपूर येथील आगामी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तेथील प्रशासनालाही अशाच प्रकारची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे शहरातील वाढते अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग आणि अतिक्रमण यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासनाने शहर विद्रुपीकरणाविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईदरम्यान सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्सही प्रशासनाच्या निशाण्यावर आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात या मोहिमेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत पुणे महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. नियम केवळ सरकारी दस्तऐवजांमध्ये असण्यासाठी नसतात, तर त्यांचे पालनही झाले पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुखकर व्हावे, हाच नियमांमागचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
अनधिकृत होर्डिंगची समस्या केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून देशभरातील अनेक शहरांमध्ये ती गंभीर बनली आहे. त्यामुळे अशा होर्डिंगविरोधात सातत्याने आणि नियमित कारवाई होणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. पुणे महापालिकेने यासाठी स्वीकारलेली अभिनव आणि खास 'पुणेरी' पद्धत कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी फडणवीस यांनी मिश्किल शब्दांत प्रशासनाला महत्त्वाची सूचनाही केली. "उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा," असे ते म्हणाले. नेते असोत किंवा कार्यकर्ते, त्यांनी जनतेमध्ये दिसले पाहिजे; बेकायदा होर्डिंगवर नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
नागपूरमध्येही अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाईचे संकेत
नागपूर येथे लवकरच विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातही अनधिकृत होर्डिंगविरोधात प्रभावी मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. शहर विद्रुपीकरण रोखण्यासाठी नागपूर प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे पुणे महापालिकेची ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम?
पुणे महापालिकेने २४ नोव्हेंबरपासून अनधिकृत फ्लेक्सविरोधात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही अभिनव मोहीम सुरू केली आहे. नागरिकांना अनधिकृत फ्लेक्सचे फोटो काढून महापालिकेच्या bhauflexkadha.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. सर्वाधिक अनधिकृत फ्लेक्स आढळलेल्या व्यक्तींची नावे आणि छायाचित्रे २४ तासांच्या आत संकेतस्थळावर ‘विद्रुपीकरण पुरस्कार’ अंतर्गत प्रसिद्ध केली जाणार आहेत.
या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी राजकीय पदाधिकारी आणि व्यावसायिकांच्या अनधिकृत जाहिरात फलकांची माहिती समोर आली. भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि सुनील पांडे यांची नावे पहिल्या पुरस्काराच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. व्यावसायिक आणि ब्रँड्सच्या गटात ब्रम्हप्रिया वर्ल्ड स्कूल, आर जीज बिर्याणी आणि शांतिप्रिया/शांती शिखर यांची नावे जाहीर झाली.
विशेष म्हणजे, या मोहिमेला नागरिकांकडून पहिल्याच दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाढदिवस, नियुक्त्या, स्वागत, सत्कार आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने चौक, रस्ते, पदपथ तसेच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सविरोधात नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा दावा करणाऱ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाच आता या मोहिमेमुळे उत्तर द्यावे लागत आहे.
एकंदरीत, पुणे महापालिकेच्या या मोहिमेमुळे अनधिकृत फ्लेक्सचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे आगामी काळात इतर शहरांमध्येही अशा प्रकारच्या कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.
