सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाचे खासदार गैरहजर राहणार, निलेश लंकेनीही ऐनवेळी बदलला निर्णय
 DIGITAL PUNE NEWS

इंडिया आघाडीच्या बैठकीकडे शरद पवार गटाची पाठ! निलेश लंके यांचाही ऐनवेळी निर्णय बदलला; एकही खासदार उपस्थित राहणार नाही

डिजिटल पुणे    28-11-2026 12:22:06

नवी दिल्ली : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात परिसीमन विधेयकावरून इंडिया आघाडीतील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. या विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर आता पक्षाने इंडिया आघाडीच्या बैठकीपासूनही दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. दिल्लीत आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला शरद पवार गटाचा एकही खासदार उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात असलेल्या खासदार निलेश लंके यांनीही ऐनवेळी आपला निर्णय बदलला आहे.

परिसीमन विधेयकावरून इंडिया आघाडीत मतभेद

संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सकाळी ११.३० वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत विधेयकाला विरोध करण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी पावसाळी अधिवेशनात एनडीएकडून परिसीमन विधेयक मांडण्यात आले होते. त्यावेळी विरोधी पक्षांनी एकत्र येत या विधेयकाला विरोध केला होता. मात्र, आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याने विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या भूमिकेमुळे शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यातील अंतर वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहिमेत सहभागी होणार

इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाचे खासदार उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीचे कारण देत बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. मात्र, खासदार निलेश लंके बैठकीला जाणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून पवार गटाची मनधरणी करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, आता निलेश लंके यांनी बैठकीला जाण्याऐवजी तोरणा किल्ल्यावरील गड-किल्ले स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दुसरीकडे, खासदार भास्कर भगरे हेही महाराष्ट्रातच असल्याची माहिती आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपनेही लोकसभा खासदारांची बैठक बोलावली

दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही २९ नोव्हेंबर रोजी दिल्लीत आपल्या सर्व लोकसभा खासदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सुधारित महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासंदर्भात खासदारांना माहिती दिली जाणार आहे. तसेच लोकसभेतील पक्षाची रणनीती, मतदानाची भूमिका आणि अधिवेशनादरम्यान खासदारांची उपस्थिती याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

एकीकडे इंडिया आघाडी परिसीमन विधेयकाविरोधात एकत्रित रणनीती आखण्याच्या तयारीत असताना शरद पवार गटाच्या खासदारांनी बैठकीला अनुपस्थित राहण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे आगामी संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांची एकजूट कायम राहणार की मतभेद अधिक तीव्र होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती