सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

निरोपाचा क्षण!! ‘चला हवा येऊ द्या’चा हास्य प्रवास आज थांबणार; आजचा शेवटचा एपिसोड काही तासांवर

डिजिटल पुणे    16-03-2024 18:03:26

मुंबई :  झी मराठी ही महाराष्ट्रातील प्रेक्षकांची अत्यंत लाडकी वाहिनी आहे आणि या वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम आहे. गेली १० वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे अगदी खळखळून निखळ मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक दिग्गज हास्यविरांनी आपल्या अभिनया शैलीतून आणि कमालीच्या कॉमिक टाइमिंगने प्रेक्षकांना लोट पोट करून हसवले आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि डॉक्टर निलेश साबळे या मंडळींनी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांशी घट्ट नाळ बांधून ठेवली. मात्र, आता निरोपाचा क्षण जवळ आला आहे.

चला हवा येऊ द्याची टिम निरोपासाठी सज्ज 

गेल्या १० वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केल्यानंतर आता ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम निरोप घेत आहे. अवघ्या काही तासांनी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम संपणार, अशी चर्चा होती. मात्र, चाहत्यांना हा कार्यक्रम संपू नये असेच वाटत होते. लाफ्टरचा बूस्टर डोस असणारा हा कार्यक्रम आता निरोपासाठी सज्ज झाला आहे आणि उद्या १७ मार्च २०२४ रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला निरोप देताना झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर व्ही. आर. हेमा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.त्या म्हणाल्या की, ‘चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने मनोरंजनाचा स्तर एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवला आहे. या टीममधल्या प्रत्येकानं लोकांच्या हृदयात आपलं वेगळं असं स्थान निर्माण केले आहे. वाहिनीसोबत असलेलं या टीमचे नातं हे अलौकिक आहे. तुमच्या लाफ्टर डोसचा बुस्टर डोस घेऊन ही टीम तुमच्यासाठी नव्या जोमात परत येणार आहे’.

अल्पविरामानंतर पुन्हा भेट

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने जगभरातील विविध भाषिक लोकांना प्रचंड हसवले आहे. निलेश साबळेचं ‘कसे आहात? हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हे वाक्य ऐकून क्षणात तणावमुक्त होणारे प्रेक्षक आपल्या लाडक्या कार्यक्रमाला निरोप देताना भावुक झाले आहेत. पण महत्त्वाचे असे की, चाहत्यांची निराशा होऊ नये म्हणूनच एका अल्पविरामानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा संपूर्ण टीमसोबत प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. त्यामुळे चाहत्यांची आणि हास्यविरांची पुन्हा एकदा भेट होणे आहे. तूर्तास शेवटचा भाग रविवारी १७ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती