सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

'हसताय ना ? हसायलाच पाहिजे' २० एप्रिलपासून पुन्हा येणार भेटीला पण आता 'कलर्सवर मराठीवर'

पुजा    03-04-2024 17:31:19

मुंबई :  झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या आवडता शो 'चला हवा येऊ द्या'ने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारे निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचे चाहते हा शो संपल्यामुळे नाराज झाले होते. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम तुम्हाला हसवण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. त्यांचा नवा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी या दोघांना विनोदवीर ओंकार भोजने देखील साथ देणार आहे. 

निलेश या कार्यक्रमाच्या दिग्दर्शन, सूत्रसंचालन आणि लेखन करणार असून त्याच्या बरोबर भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे कलाकारही कार्यक्रमाची धुरा सांभाळणार आहेत. या सोबतच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार सुद्धा दिसणार आहेत. यासोबतच सुपरस्टार भरत जाधव आणि अभिनेत्री अलका कुबल आठल्ये सेलिब्रिटी परीक्षक म्हणून हजेरी लावणार आहेत. सोशल मीडियावर निलेश, भाऊ आणि ओंकार यांचे फोटोज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. २० एप्रिल २०२४ पासून शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

नव्या कार्यक्रमाविषयी निलेश म्हणाला, ‘‘हसताय ना?? हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमात कलाकृतींचं प्रमोशन केलं जाणार आहे. पण त्याचा साचा पूर्वीच्या शोपेक्षा काहीसा वेगळा असेल. कार्यक्रमात सहभागी होणारे पाहुणे सेलिब्रिटीसुद्धा प्रहसन आणि तत्सम वेगवेगळ्या सेगमेंटचा भाग असणार आहेत. तसंच मनोरंजनासह प्रबोधन करण्याचं कामंही केलं जाणार आहे. सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील काही प्रश्नांभोवती फिरणारे दोन सेगमेंट असतील. त्यातील प्रहसनांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम केलं जाईल. त्यामध्ये प्रेक्षकांना त्यांना रोजच्या जीवनात भेडसावणारी एखादी समस्या दिसू शकते.’ 

कार्यक्रमाच्या स्वरुपात नाविन्य असल्याचंही निलेशनं सांगितलं. ‘‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रामाचा साचा लोकांना माहिती झाला आहे. त्यामुळे नव्या शोचं स्वरूप बदलणार असून तो पूर्णपणे वेगळा दिसेल. ‘हसताय ना...’ हा कार्यक्रम आणखी उंचावर नेण्याचा आमचा प्रयत्न असेल. कलाकारांची टीमही यावेळी नवीन आहे. त्यातील प्रत्येकाचा चाहतावर्ग मोठा आहे. प्रत्येकाचं विनोदाचं टायमिंग भन्नाट आहे. शोमध्ये असणारी पात्रं नवीन असतील; त्यामुळे प्रेक्षकांना नवा कार्यक्रम बघताना मजा येईल यावर माझा विश्वास आहे’, असं निलेश म्हणाला.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती