सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

अनिर्वाच्य निरुपण (भाग २)

डिजिटल पुणे    14-04-2024 11:23:19

अनिर्वाच्य निरुपण (भाग २)
 
मागील लेखापासून पुढे ...
 
सिद्धांत वस्तू लक्षु जाता | सर्व साक्षी ते अवस्ता | आत्मा तीहून पर्ता | अवस्तातीत ||६/१०/१५||
 
शेवटच्या अनुभवाच्या दृष्टीने पाहिले तर मी सर्व साक्षी आहे, या अवस्थेच्या पलीकडे असणारे आत्मस्वरूप सर्व साक्षीपणाच्याही पलीकडे राहते.
 
सर्व साक्षिणी तुर्यगा किंवा उन्मनी अवस्था व कैवल्यावस्था
आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे व विवेकख्याती (द्रष्टा मी आणि दृश्य असलेले चित्त व वृत्ती यापासून मी वेगळा आहे असा विवेक उदित होणे) प्राप्त झाल्यामुळे धर्मामृत धारांचा वर्षाव करणारा जणू मेघच असलेली धर्ममेघ समाधी योग्याला प्राप्त होते. योग्याला ज्ञानाच्या ठिकाणी अनंत्तत्व आणि अज्ञानाच्या ठिकाणी अल्पत्व प्राप्त होते. प्रकृतीचे घटक असलेले सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण हे कृतार्थ होत जातात. म्हणजे समतेला जात राहतात. असा योगी जगात वावरतानाही तत्वत: समाधीमध्येच असतो. त्यालाही तहानभूक लागते पण अन्न मिळेल का नाही ? याची चिंता नसते. कुठेही झोपेल. स्मशान व घर सारखेच होऊन जाते. वस्त्र मिळाले नाही तर दिगंबर राहतो. सत्व गुणाचा अतिशय उद्रेक झालेला असतो. देहात मनासह सर्व ज्ञानेंद्रियांच्या द्वारा प्रकाश व ज्ञान ओसंडून वाहत असते. असे योगी जगाचे कल्याण करतात.
 
देहापासून सर्व पदार्थ एकरसमय आहेत असा अनुभव तो घेतो. स्थूल, सूक्ष्म, कारण या तीनही देहातून तो मुक्त होऊन तुरीय म्हणजे चौथ्या उन्मनी (जागृती, स्वप्न व सुषुप्ती नंतरची स्थिती) अवस्थेवर पोहोचलेला असतो. म्हणून यास तुर्यगा असे म्हणतात. ही सर्व साक्षी स्थिती असते. या धर्ममेघ समाधीमुळे नवीन शरीर धारण करण्यासाठी आवश्यक कर्माशय शिल्लक राहिलेला नसतो. त्यामुळे पुनर्जन्म मिळत नाही पण शिल्लक असलेल्या देहाचे अस्तित्व मागील कर्माचा विपाक असे पर्यंत अस्तित्वात राहते. म्हणून तो योगी समाधीमध्ये गेला तरी इतरांना त्याचा देह दिसतो. याच स्थितीला तुर्यगा किंवा उन्मनी स्थिती म्हणतात. इथे त्रिगुणांच्या परिणामक्रमांची समाप्ती झालेली असते. त्यामुळे चित्त पूर्णपणे निरुद्ध असते. शरीर सृष्टी नियमाने विघटन होत होत शरीराचा व प्राणाचा वियोग होईपर्यंत जीवनमान राहते. प्राणवियोग होताच शरीर सुटते व योगी विदेहमुक्तीला प्राप्त होतो. ही अंतिम ज्ञानभूमी आहे.
 
या स्थितीत सत्त्व गुणाचा उद्रेक असतो. आत्मसुख असते. सत्वगुण कृतार्थ झालेला नसतो. निर्विकल्प समाधी टिकून राहते. यात निरोध परिणामाची प्रशांतवाहिता त्रिगुणांची परिणामक्रम समाप्त होईपर्यंत चालू राहते. सत्वगुण कृतार्थ होईपर्यंत ही स्थिती असते. जीवाला मोक्ष सुख देणे हे शुद्ध सत्वगुणाचे कार्य व्हायचे राहिलेले असते. काही काळानंतर हा शुद्ध सत्त्वगुण कृतार्थ होऊन जातो. तोपर्यंत चित्तही निरोध पावत जाते. शेवटी तुर्यगा स्थितीही संपून जाते.
 
मग चेतन पुरुष अविद्यानाश झाल्यामुळे आपल्या स्वरूपात प्रतिष्ठीत होतो. हीच कैवल्यावस्था होय. इथेच खरे समाधान आहे. त्रिगुणांच्या प्रतीप्रसवानंतरची ही स्थिती आहे. जीवन्मुक्त अवस्थेत जरी तत्वत: योग्याला मुक्तावस्था मिळालेली असली तरी त्याचे स्थूल व सूक्ष्म देह विद्यमान असतात. तो त्याला साक्षित्वाने, वेगळेपणे बघतो. म्हणून ही सदेह मुक्ती होय. या सदेह मुक्तीतील तुर्यगा ही शेवटची स्थिती आहे,
 
ही तुर्यगा अवस्था संपताच गुणांचा प्रतिप्रसव जे स्थूल देह निर्माण झालेले असतात. ते उत्पत्तीच्या उलट क्रमाने स्वकारणात विलीन होतात. त्यामुळे योग्याचे दोनही देह नाश पावतात व तो विदेहमुक्तीला जातो. म्हणजे तुर्यगा स्थितीनंतर येणारे विदेह मुक्तीचे स्वरूप म्हणजे कैवल्यावस्था होय. तो स्वरूपात स्थित होतो. त्यामुळे सदेहमुक्ती प्राप्त झाल्याने, विदेहमुक्ती मिळेपर्यंत योग्याला मिळणारे समाधान तो शब्दात मांडू शकत नाही. त्याच्या शिष्यांवर कृपा करून तो त्यांच्यात तो अनुभव प्रगट करू शकतो. हे निशब्दातून चालणारे प्रवचन असते. शब्द जरी उच्चारले तरी ते शब्द ज्या अर्थाला वाहतात तो अर्थ सूक्ष्म असतो. ते शब्द श्रवण करताना शिष्याला कानात प्राण गोळा करणे आवश्यक असते.
 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती