परभणी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. पण सध्या त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले होते. अजित पवार यांनी एक रुपया विमा या योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला अशा आशयाचे वक्तव्य केले. यामुळे आता शेतकरी आक्रमक झाले असून अजित पवारांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फेकण्यात आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (दि.26) परभणीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विकासकामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महानगरपालिकेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकी आहेत. मात्र अजित पवार यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन परभणीमध्ये वातावरण तापले. अजित पवार यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटबाहेर युवक कॉंग्रेस व किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांबाबत वक्तव्य केले होते. अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा देण्याच्या योजनेला चुना लावला असे वक्तव्य केले होते. त्यामुळे परभणीमध्ये आक्रमक आंदोलकांनी अजित पवारांच्या ताफ्यावर चुन्याच्या डब्या फेकल्या. यामुळे रस्त्यांमध्ये चुन्याच्या डब्या पडलेल्या दिसून आल्या. आक्रमक कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या ताफ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना पूर्ण प्रयत्नांनी अडवले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आक्रमक आंदोलकांना नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. पोलिसांनी आंदोलकांना हा प्रकार करण्यापासून रोखले. तसेच आंदोलकांना ताब्यात देखील घेतले. मात्र यामुळे ताफ्याला जाण्यासाठी वळून जावे लागले. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली. अजित पवारांचा धिक्कार असो…सरकार हमसे डरती है, पोलीस को आगें करती है…अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परभणीमधील माळसोन्ना या गावी एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीनेही आत्महत्या केली. एकाच कुटुंबात या दोन आत्महत्या घडल्यानंतर या कुटुंबीयांना अजित पवार यांनी भेट दिली नाही. यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही पण, आपल्या बगलबच्चाना टेंडर मिळवून देण्यासाठी ते परभणीत आले आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो अशी प्रतिक्रिया जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी दिली. निवडणुकीच्या काळात सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते पण अजित पवारांनी स्वतःचीच सत्तर हजार कोटीची सिंचन घोटाळ्याची माफी करून घेतली या सरकारचे सगळ्यात मोठे लाभार्थी तेच आहेत असेही जाधव यावेळी म्हणाले.