पुणे: समाजात सौहार्द,समजूतदारपणा आणि शांतता वाढवण्याच्या उद्देशाने जमात-ए-इस्लामी हिंद (कॅम्प,पुणे) यांच्या वतीने आयोजित 'विविधतेतील एकता हीच ताकद' या विषयावरील सर्वधर्मीय परिसंवाद दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील ऑर्बिट हॉटेल, आपटे रस्ता, डेक्कन जिमखाना येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या परिसंवादात विविध धर्मांचे मान्यवर अभ्यासक सहभागी झाले होते.'जमात-ए-इस्लामी हिंद'चे उपाध्यक्ष सलीम इंजिनिअर(नवी दिल्ली),बुद्धिस्ट कल्चर स्टडी सेंटर(पुणे) येथील झेन मास्टर भंते सुदस्सन,व्हीआयटी कॉलेज(पुणे)चे संचालक आणि इस्कॉन पुणेचे उपाध्यक्ष राजेश जालनेकर तसेच इग्नाशियस चर्च (खडकी) चे सहायक पाद्री फादर डेनिस जोसेफ (पुणे डायसिस) यांनी आपले मते मांडली.चर्चेचे संचालन डॉ.सलीम खान(मुंबई) यांनी प्रभावीपणे केले.करीमुद्दीन शेख यांनी प्रास्ताविक केले.
परिसंवादात धर्मांमधील परस्परसंबंध,ईश्वराच्या संकल्पना,विविधतेतील सौंदर्य,धार्मिक नेत्यांची भूमिका आणि सध्याची सामाजिक आव्हाने यावर सखोल चर्चा झाली.सर्व वक्त्यांनी एकमुखाने विविधतेतील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि परस्पर सन्मान,संवाद व सहकार्याच्या भूमिकेची गरज प्रतिपादन केली.विविध धर्मीय नागरिक,युवा आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच हल्ल्याचा निषेध करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता सर्व धर्मांच्या प्रतिनिधींनी एकतेचा संदेश देत केली.उपस्थितांनी असे उपक्रम अधिक नियमितपणे होण्याची अपेक्षा व्यक्त केली.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन,सुभाष वारे,डॉ.प्रवीण सप्तर्षी,प्रा.रमा सप्तर्षी,संदीप बर्वे,प्रा.नीलम पंडित,इब्राहिम खान आदी उपस्थित होते.
भन्ते सुदसन्न म्हणाले,'आपल्या मनाची अवस्था आणि दैनंदिन कामातून सर्व गोष्टी घडतात.मानवतेसाठी हे कार्य होईल,याची काळजी घेतली पाहिजे.केवळ करुणा व्यक्त करून उपयोग नाही.सलीम इंजिनियर म्हणाले,'ईश्वर सर्वव्यापी,सर्वशक्तिमान आहे.आपण जे काही करतो,त्याची नोंद होत असते,हे लक्षात घेतले पाहिजे.एकता ही ईश्वराची देणगी आहे.अन्याय,भेदभाव नष्ट व्हावेत,हेच धर्माचे उद्दिष्ट असते'.जालनेकर म्हणाले,'सृष्टी तयार करूनही परमेश्वराने स्वतःचे अस्तित्व प्रकट केलेले नाही.प्रेम,स्नेहाची देवाण घेवाण हाच ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे.फादर डेनिस जोसेफ म्हणाले,'एकमेकांना समजून घेणे हीच ईश्वराची शिकवण आहे.क्षमाशीलता असणे महत्वाचे आहे'.