पुणे : नवले ब्रिजवर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसताना आज पुन्हा एकदा या मार्गावर मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. ट्रेलरच्या ब्रेक फेल झाल्याने तुफान वेगात असलेल्या वाहनाने तीन वाहनांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात एक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हा अपघात इतका जबरदस्त होता की वाहनांचे पुढचे भाग अक्षरशः चक्काचूर झाले. घटनास्थळी पाहणाऱ्यांची गर्दी झाली होती, आणि काही वेळातच प्रचंड वाहतूक कोंडीने संपूर्ण परिसर ठप्प झाला. वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्याचं काम सध्या सुरू असून, याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळीही झाला होता अपघात – ‘कधी थांबणार ही मालिका?’
विशेष म्हणजे, आज सकाळीही नवले ब्रिज परिसरात अपघात झाला होता. संध्याकाळपर्यंत दुसऱ्या अपघाताने परिसर पुन्हा हादरला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “दर दोन-तीन दिवसांनी अपघात होतो, कुठे चुकतंय हे प्रशासन पाहणार कधी?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
अवघड रचना, वेगावर नियंत्रण नाही, उपाययोजना शून्य
नवले ब्रिजवर वारंवार होणाऱ्या अपघातांचे मुख्य कारण म्हणजे:
• रस्त्याचा तीव्र उतार
• ट्रक आणि ट्रेलरच्या वाहतुकीवर अपुरे नियंत्रण
• वेग मर्यादेचे उल्लंघन
• वाहतूक पोलिसांचा अपुरा बंदोबस्त
यापूर्वी अनेक वेळा हे मुद्दे उपस्थित करूनही प्रशासनाकडून फक्त तात्पुरत्या उपाययोजनाच करण्यात आल्या आहेत. अपघात थांबलेले नाहीत, उलट वाढतच चालले आहेत.
स्थानीय नागरिकांमध्ये संताप; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
या अपघातानंतर नागरिकांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. “प्रशासनाने अपघातग्रस्त पट्ट्यावर तातडीने स्पीड ब्रेकर, सिग्नल यंत्रणा, सीसीटीव्ही, आणि ट्रक वळवण्याच्या योजना राबवल्या पाहिजेत,” अशी मागणी स्थानिक रहिवासी सातत्याने करत आहेत.