नवी दिल्ली : भारताने अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली आहे. पहलगाम हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याला चोख उत्तर दिले जाईल असे इशारा पाकिस्तानला दिला होता. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. यावरुन आता ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रतिक्रीया आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्वीट करत भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले आहे.
नेमकं काय म्हणाले पवार?
“आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद!”, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका
पाकिस्तानमध्ये हल्ला केल्यानंतर भारताने जागतिक समुदायाला पारदर्शक माहिती देण्याचा निर्णय घेतला. विशेषत: अमेरिका, रशिया आणि ब्रिटन या देशांना या कारवाईबाबत माहिती देऊन, भारताच्या भूमिकेला जागतिक पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर‘ अंतर्गत करण्यात आलेल्या लक्ष्यित हवाई हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे. यासह लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या तळांनाही जमिनदोस्त करण्यात आले आहे. पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले, ज्यामुळे दहशतवाद्यांच्या मोठ्या हालचालींना जबरदस्त धक्का बसला आहे.