उरण : महाराष्ट्रातील सातारा येथे महेंद्रशेठ घरत यांचा शुक्रवारी (ता. ९) थोर देणगीदार म्हणून माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'महेंद्रशेठ तुम्ही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात चांगले काम करीत आहात, तुमचे योगदान मोठे आहे' अशी शाब्बासकीची थाप पाठीवर देऊन महेंद्रशेठ घरत यांचे कौतुक केले. महेंद्रशेठ यांचा 'रयत'तर्फे सलग तीन वर्षे सत्कार होत आहे.
कर्मवीर अण्णांची ६६ वी पुण्यतिथी सातारा येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी 'यमुना सामाजिक संस्थे'चे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना थोर देणगीदार म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि शकुंतला ठाकूर यांनीही शरद पवार यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. त्यामुळे रायगडचा बोलबाला आणि दबदबा 'रयत' मध्ये असल्याचे चित्र सातारा येथे दिसत होते.
यावेळी माजी संरक्षण मंत्री शरद पवार म्हणाले, "रयत शिक्षण संस्थेची वाटचाल कालानुरूप सुरू आहे, अनेक देणगीदारांचे हात मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे रयतची सर्वांगाने होत असलेली प्रगती अभिमानास्पद आहे."
"गव्हाण परिसरात रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूल दिवंगत ज. आ. भगत साहेब यांच्या पुढाकाराने सुरू झाले. त्यामुळे माझ्यासारखे पंचक्रोशीतील असंख्य गोरगरीब विद्यार्थी शिकू शकले. 'रयत'मध्ये माझे शिक्षण झाले, म्हणूनच मी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करतोय. याचा मला अभिमान आहे. त्यामुळेच मी माझ्या उत्पन्नातील काही रक्कम 'रयत'च्या दुर्गम भागातील शाळांना सढळ हस्ते मदत करतोय. 'रयत'चे माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी रयतसाठी सढळ हस्ते मदत करण्यात मला आनंद आहे. तसेच यमुनाबाई सामाजिक, शैक्षणिक संस्था, शेलघर ही आम्ही कर्मवीर अण्णांचा आदर्श घेऊन गोरगरिबांसाठीच काढली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातूनही गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम मी करतोय. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत मी आणि सौभाग्यवती शुभांगीताई यांनी आर्थिक मदत करून खारीचा वाटा उचलून कर्तव्य केले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे", अशा भावना आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी माजी संरक्षण मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 'रयत'चे सचिव विकास देशमुख यांनी प्रास्ताविक केले.संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, भगिरथ शिंदे आणि रयतचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी 'रयत' मासिक, रयत विज्ञान पत्रिका, शोध मराठी मनाचा यांचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.