पुणे : राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये, हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा सरकारचा मानस आहे. सरकारने काढलेल्या जीआरमधील अनिवार्य शब्द काढण्यात आला असला तरी हिंदी भाषा कशी गरजेची आहे? हे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. हिंदी सक्ती विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत एकत्र मोर्चा काढणार आहेत.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात रणशिंग फुंकले आहे. येत्या ५ जुलै रोजी ते मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. जवळजवळ सर्व विरोधी पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. इय़त्ता पहिलीपासून हिंदी सक्ती लादण्याच्या या निर्णयाला आता भाजपमधूनच विरोध असल्याचं समोर आलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मी फक्त मराठीच बोलणार, हिंदी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अशोक उईके यांची आज पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच त्यांनी मला हिंदी येत नाही, मी हिंदी बोलणार नाही. मी फक्त मराठीत बोलेन, मी हिंदीत बोलणार नाही. माझा जन्म एका आदिवासी कुटुंबात झाला असून आई अज्ञान आणि अनपढ आहे. माझ्या आईने मला मराठीत संस्कार दिलेत आहेत. मी तेच बोलणार आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. एकीकडे मुंबईत हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे.तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांनीच हिंदीत नाही तर मराठीत बोलणार असं विधान केलं. उईके यांनी हिंदीसक्ती विरोधात घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मराठी बोलण्यावरच ठाम मत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती नको, अशी भूमिका अनेक पक्ष आणि संघटनांनी घेतली आहे. या हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ५ जुलै रोजी संयुक्त मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाची आता जय्यत तयारी सुरू आहे. मोर्चाचा मार्ग आणि वेळ लवकरच निश्चित केली जाईल. मनसेकडून संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, तर ठाकरेंच्या शिवसेनेतील संजय राऊत, वरुण सरदेसाई आणि इतर काही नेत्यांवर मोर्चाच्या नियोजनाची आणि तयारीची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.तर मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक दिली जात आहे. मनसेकडून मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये जाऊन मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्चाला शरद पवार गटाचा पाठिंबा
दरम्यान, जवळजवळ सर्व विरोधी पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक पत्रक जारी करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या मोर्चात सामील होण्याचे आवाहन करण्यात आलं.