पुणे : पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर अचानक कुत्रा आल्याने विमानानं हवेतच बऱ्याच वेळ घिरट्या घातल्याचा प्रकार पाहायला मिळाला. वैमानिकाने सुमारे दीडशे फूट उंचीवर असताना लँडिंग थांबवले. या प्रकारामुळे एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. भुवनेश्वरहून पुण्याकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या (IX-1097) विमानाच्या लँडिंगच्या अंतिम टप्प्यात शनिवारी सायंकाळी थरारक प्रसंग घडला. सायंकाळी सहाच्या सुमारास विमान पुणे विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना, धावपट्टीवर अचानक कुत्रा दिसल्याने वैमानिकाने लँडिंग रद्द करण्याचा तात्काळ निर्णय घेतला. वैमानिकाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सजगतेने निर्णय घेत पुन्हा हवेत भरारी घेतली, ज्यामुळे मोठा अपघात टळला.
आय एक्स 1097 हे एअर इंडियाचं विमान भुवनेश्वरवरून पुण्याला येत होते. हे विमान भुवनेश्वरवरून पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरवण्याच्या प्रक्रियेत होते. मात्र आकाशात विमान सुमारे 100 ते 150 फूट उंचीवर असताना वैमानिकाला धावपट्टीवर कुत्रा आढळून आला.यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वैमानिकाने लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा विमान हवेत झेपावले विमान आणखी काही फूट खाली असते तर वैमानिकाला पुन्हा विमान आकाशात झेपावणे अवघड झाले असते. दरम्यान, पुणे विमानतळावरून कुत्र्याला हुसकावून लावल्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. मात्र यामुळे विमानाला सुमारे एक तास उशीर झाला..
या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, धावपट्टीवर प्राणी कसा पोहोचला, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वैमानिकाच्या दक्षतेमुळे सगळे प्रवासी सुखरूप आहेत.संबंधित यंत्रणांनी या घटनेची दखल घेत सुरक्षेचे उपाय अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत.
पुणे विमानतळावर गेल्या काही दिवसापासून पक्षी आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यामुळे विमानाच्या संचलनात बाधा निर्माण होत आहे.यापूर्वी विमानाच्या इंजिनमध्ये पक्षी गेल्याची घटना देखील काही दिवसापूर्वीच घडली होती. आता पुन्हा धावपट्टीवर कुत्रा आल्याने प्रवासी सुरक्षाच धोक्यात आली आहे. शनिवारी विमान उतरत असतानाच नेमकी ही घटना घडली. कुत्रा दिसताच विमान परत आकाशाकडे झेपावले. तशातच, उतरण्याच्या मानसिकतेत असलेले प्रवासीही गोंधळले. वैमानिकाने पुन्हा हवेत झेप घेतल्यानंतर ‘गो-अराऊंड’ पद्धतीने घिरट्या घालीत राहिले. विमान अशाप्रकारे हवेत अर्ध्यातासापेक्षा जास्त कालावधीसाठी होते.