मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.सदस्य चेतन तुपे यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ची स्थापन करून या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्यात येईल. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून दोषींना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवरही कठोर कारवाई करण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बीड येथील एका कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीच्या झालेल्या लैंगिक शोषणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली. प्रस्तुत प्रकरणाची संभाव्य व्याप्ती तथा संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेईल. एका वरिष्ठ दर्जाच्या महिला आयपीएस अधिकाऱ्याच्य नेतृत्वात ही समिती कालबद्धपणे आपला तपास करून या गुन्ह्याचा छडा लावेल. या प्रकरणी कुणालाही पाठिशी न घालता पीडित मुलींना न्याय देण्यात येईल, असे ते म्हणालेत.
भाजप सदस्य चेतन तुपे यांनी बीडमधील लैंगिक शोषणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य या महाराष्ट्रात घडले आहे. बीडमधील एका कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाले आहे. सध्या या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक झाली आहे. त्यांच्यावर पोस्कोचा गुन्हाही दाखल करण्यात आला. पण या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. सरकारने या प्रकरणी एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली.
मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना म्हणाले की, सभागृहाचे सदस्य चेतन तुपे यांनी बीडमध्ये घडलेल्या एका अतिशय गंभीर घटनेचा मुद्दा उपस्थित केला. कोचिंग क्लासेसला येणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यातील एका पीडित मुलीने व तिच्या आईने हिंमतीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाची वस्तुस्थिती बाहेर आली. या अंतर्गत पोस्को कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन्माननीय सदस्याने या प्रकरणी काही मुद्दे उपस्थित केलेत. या प्रकरणी आरोपींची दोनच दिवसांची कोठडी का मागण्यात आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याची चौकशी केली जाईल. या प्रकरणी बीडसह संपूर्ण राज्यात रोष पसरला आहे. कारण, या प्रकरणाची व्याप्ती अधिकची असू शकते. एक मुलगी हिंमतीने पुढे आली, पण ही घटना अनेक मुलींसोबत घडल्याचा संशय आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती व संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने या प्रकरणाची वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एक एसआयटी चौकशी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एसआयटीच्या माध्यमातून या गुन्ह्याचा तपास केला जाईल.
"एसआयटीच्या माध्यमातून या गुन्ह्याची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाची व्याप्ती कुठपर्यंत आहे? यामागे कुणाचा वरदहस्त आहे का? कुणी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या वेगवेगळे वळण देत आहे का? या सगळ्याची चौकशी करण्यात येईल. तसेच या माध्यमातून आमच्या मुलींना योग्य न्याय मिळावा यादृष्टीने आम्ही प्रयत्न करू. टाईम बाऊंड पद्धतीने एसआयटी याची चौकशी करेल. याप्रकरणाचा पूर्ण छडा लावून अशा नराधमांना आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.