मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेने मनसे नेते जावेद शेख यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. मद्यपान करून गाडी चालवली अन् अपशब्दही वापरले, असा आरोप राजश्री मोरेने केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगात व्हायरल होत आहे, यावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात मध्यरात्री ही घटना घडली असून अर्धनग्न अवस्थेत, दारुच्या नशेत महिलेसोबत धिंगाणा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. स्वत: राजश्री मोरेनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता शिवसेना नेते संजय निरुपम यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत मनसेला सवाल केले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद यांनी राजश्री मोरेच्या कारला धडक दिल्यानंतर तिच्यासोबत वाद घातला, तसेच गाडीचं नुकसान झालंय, तर माझ्या बापाकडून पैसे घे असे म्हणत शिवीगाळ देखील केली. विशेष म्हणजे यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना देखील राहिलने दारुच्या नशेत दम भरला. माझा बाप मनसेच्या राज्य उपाध्यक्ष असल्याचे सांगत बापाचं नावाने पोलिसांना आणि महिलेला दाखवून देण्याचे धमकी राहिलने दिली. त्यानंतर आंबोली पोलिसांनी धिंगाणा करणाऱ्या मनसे नेत्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सोशल मिडिया एन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या सोबत घडलेला हा प्रकार तिने इंस्टाग्रामवर व्हिडीओद्वारे शेअर करत सार्वजनिक केला आहे. पोलिसांना सांग… मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल. या धमकीग्रस्त भूमिकेने वाद आणखीनच चिघळला आहे. व्हिडिओमध्ये राहिल पोलीस अधिकाऱ्यांशी थेट वाद करताना दिसतो. राजश्रीने याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करुन हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने हिंदी मराठीच्या वादात उडी घेत मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने तिला टार्गेट केलं जात असल्याचंही तिने म्हटलं.
राजश्री मोरे यांनी राहिल शेख विरुद्ध गंभीर आरोपांसह नोंदणी केली. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, राजकीय दबावाने धमक्या देणे व पोलिस कार्यात अडथळे आणणे. त्यांनी FIR ची कॉपी सोशल मीडियावर शेअर केली आहे. राजश्रीने FIR नोंदविल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून तिच्यावर सतत धमक्या मिळत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे तिला मानसिक ताण जाणवू लागला असून, तिने पोलिसांना सुरक्षितता सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.
राजश्री याअगोदरही चर्चेत आली होती. मराठी भाषा लादण्याऐवजी स्थानिकांनी स्वतःची मेहनत करून स्थान मिळवावं, असं राजश्रीने म्हटलं होतं. स्थलांतरितांवर मर्यादा आणल्यास स्थानिक मराठ्यांची स्थिती बिकट होईल. या विधानांमुळे वर्सोवा येथील मनसे कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजश्रीने सोशल मीडियावरून हे व्हिडिओ काढून टाकले आणि सार्वजनिक माफी मागितली होती.