सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    07-07-2025 15:18:47

उरण : हिंदु धर्मातील अद्वितीय आणि श्रेयस्कर परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे; परंतु आजचे युग हे धर्मयुद्धाचे आहे. संपूर्ण पृथ्वीवर अधर्माचे सावट पसरले आहे. अशा काळात धर्माच्या बाजूने उभे राहणे, हाच साधनेचा आणि मुक्तीचाही सर्वोच्च मार्ग आहे. ही जाणीव प्रत्येकापर्यंत पोचवण्यासाठी आणि धर्म-राष्ट्रासाठी कर्तव्यनिष्ठा जागवण्यासाठी गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात ७७ ठिकाणी, तर रायगड जिल्ह्यात पनवेल आणि उरण या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.

प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्म आणि न्यायाच्या बाजूने लढणार्‍यांपेक्षा अधर्मींची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला, कारण भगवंताचा आशीर्वाद हा धर्माच्या बाजूने लढणार्‍यांसाठीच असतो. आजही परमकल्याणकारी गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

सनातन संस्थेच्या वतीने रायगड  जिल्हयात पुढील ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार १० जुलै २०२५,

१.  श्री बँक्वेट्स, सेक्टर १/एस, प्लॉट नंबर ११३ आणि ११४, शबरी हॉटेलच्या मागे, नवीन पनवेल. (सायं. ५:३० वा.)

२.  श्रीराम मंदिर हॉल, गणपती चौक, बाजारपेठ, उरण (सायं. ५:०० वा.)

या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन राष्ट्र शंखनाद सोहळ्याचा प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण; रामराज्य स्थापनेसाठी संकल्प आणि सामूहिक नामजपयज्ञ; समाज, राष्ट्र आणि धर्म विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन; तसेच ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयांवर मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. याव्यतिरिक्त धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि राष्ट्र-धर्म विषयक फलक प्रदर्शनही महोत्सवस्थळी लावण्यात येणार आहे.

‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ – देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ मिळावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ व मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. १० जुलैला सायं ५.३० वा. मराठी भाषेतील महोत्सवाचा लाभ पुढील लिंकवरून घेता येईल : Sanatan.org/mr/gurupurnimaधर्म, राष्ट्र आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकृपेकडे वळा आणि गुरुपौर्णिमा महोत्सवात सहकुटुंब सहभागी व्हा असे आवाहन श्रीकृष्ण उपाध्ये सनातन संस्था, रायगड यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती