सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 क्राईम

अवघी पंढरी हळहळली; पत्नीने मुलांसह विहिरीत उडी घेतली, हे कळताच पतीनेही घेतला गळफास

डिजिटल पुणे    07-07-2025 17:21:26

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने २ मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याची बातमी समजताच पतीनेही गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. ऐन आशाढी एकादशीदिवशी घडलेल्या या घटनेने अवघी पंढरी हळहळली. 25 वर्षाची पत्नी मोनाली, सहा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि चार वर्षाची मुलगी प्रगती आणि पती म्हमाजी अशी मृतांची नावं आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे ही घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू केलं आहे. विहिरीतील पाणी उपसणे सुरू असून आतापर्यंत फक्त ६ वर्षांचा मुलगा कार्तिकचा मृतदेह सापडला आहे. मोनाली आणि प्रगतीचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही. मृतदेह शोधण्यासाठी पंढरपूरची आपत्कालीन यंत्रणा विहिरीत उतरून शोध घेत आहे.

दरम्यान पंढरपूर तालुका पोलिसात याची नोंद झाली असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या कुटुंबाचा प्रमुख आणि गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या म्हमाजी आसबे यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

म्हमाजी आसबे यांची कासेवागामध्ये द्राक्ष शेती असून याच बागेतील विहिरीतच मोनालीने तिच्या दोन चिमुकल्या मुलासह आत्महत्या केली आहे. या घटनेनं, कासेवागात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी पंढरीत लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीत जमला होता. महाराष्ट्रात सळीकडे आनंदोत्सव होता. याच आनंदाच्या सोहळ्या दिवशी ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती