उरण : कामगार संघटनांच्या पाठपुराव्यामुळे सन २००६ मधे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना झाली. त्यामुळे जिल्ह्यातील किमान दोन हजार स्थानिक तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगार मिळाला. तर जिल्ह्यातील अजून साडेतीन हजार तरुण प्रतीक्षा यादीत आहेत. असे असतांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला पूर्णवेळ चेअरमन, सेक्रेटरी किंवा पर्यवेक्षक दिला जात नाही, सानपाडा कार्यालयातील अधिकाऱ्यांना तात्पुरता चार्ज देण्यात आला आहे. ते आठवड्यातून जमेल तसे येतात किंवा दोन दोन आठवडे येतच नाहीत. पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना कोणी वालीच उरलेला नाही, सुरक्षा रक्षकांच्या तक्रारींचे निरसन होत नाही.
यातच रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे बृहन्मुंबई-ठाणे बोर्डामध्ये विलीनीकरण करण्याचा षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे. जर मुंबई -ठाणे बोर्डात विलिनीकरण केले तर रायगड जिल्ह्यातील तरुणांना प्राधान्य मिळणार नाही व बाहेरून पैसे घेवून परप्रातीयांची भरती केली जाईल.परंतु हे होऊन देणार नाही वेळ पडलीच तर रायगड जिल्ह्यातील स्थानिक तरुणांच्या भविष्यासाठी सर्व पक्षीय लढा उभारू परंतु स्थानिकांच्या नोकरीवर गदा येवू देणार नाही असे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी ठणकावून सांगितले . जिल्ह्यातील सर्व सुरक्षा रक्षक व प्रतीक्षा यादीतील तरुणांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची शेलघर येथे भेट घेतली असता ते बोलत होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून सर्व पक्षातील नेत्यांनी स्थानिक तरुणांच्या मागे ठामपणे उभे राहावे असेही ते याप्रसंगी म्हंटले.