मुंबई – मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे, या मागणीवरून विधानपरिषदेत आज तीव्र शाब्दिक चकमक झाली. राज्य सरकारचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे आमदार अनिल परब यांच्यात चांगलाच वाद झाला. अनिल परब यांनी मराठी माणसासाठी मुंबईतील घरांमध्ये आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात यावा, अशी ठाम मागणी सभागृहात केली.
मात्र या मागणीवरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वाद वाढत असताना मंत्री शंभूराज देसाई यांनी अनिल परब यांना उद्देशून "बाहेर ये तुला दाखवतो" अशी धमकी दिली, असा आरोप करण्यात आला. या वक्तव्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि वातावरण तापलं.
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मंत्री देसाई यांच्या वर्तनाचा निषेध केला आणि सरकारकडून दिलगिरीची मागणी केली. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करत सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
या संपूर्ण घटनाक्रमामुळे मराठी माणसाच्या घरांवरील हक्काचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, या विषयावर राजकीय पक्षांमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. मुंबईसारख्या महानगरात मराठी भाषिकांना घर खरेदी करताना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्या संदर्भातील शासकीय भूमिका यावरून पुढील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.