मुंबई : मुंबईत एका बेस्ट बसचा ट्रकला धडकून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.ही धडक इतकी जबरदस्त होती की, बसमधील पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सव्वा सहाच्या सुमारास पश्चिम द्रुतगती मार्गावर हा अपघात घडलाही बस बोरिवलीहून अंधेरीच्या दिशेने जात होती. गोरेगाव परिसरात वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जात असताना बेस्ट चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यावेळी बस प्रचंड वेगात होती. नियंत्रण सुटल्यामुळे बेस्ट बसने एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक जोरदार असल्यामुळे बसमध्ये असलेले पाच ते सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाहनांचे मोठे नुकसान, बस चालक ताब्यात :
प्राथमिक माहितीनुसार, बेस्ट बस प्रचंड वेगात होती आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने ट्रकला मागून धडक दिली. जखमी प्रवाशांना तातडीने जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये सकाळची वेळ असल्यामुळे तुलनेत कमी प्रवासी होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं सांगण्यात येत आहे.
या अपघातात बेस्ट बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले असून ट्रकच्या मागच्या बाजूलाही मोठा फटका बसला आहे. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे तुकडे रस्त्यावर विखुरले गेले. घटनास्थळी तत्काळ पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. सध्या वनराई पोलीस ठाण्यात बेस्ट चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली :
घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा वेग खूप जास्त होता आणि थोडा वेगळा वेळ असता तर बसमध्ये अधिक प्रवासी असण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठा जीवितहानी टळली असं स्पष्ट होत आहे.दरम्यान, अपघातामुळे काही वेळ वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली.