पुणे: भारतीय संस्कृतीतील गुरुत्वाच्या पवित्र परंपरेला अभिवादन करत, "तरुण विचारांना सक्षम दिशा" या संकल्पनेखाली गुरुपौर्णिमेनिमित्त भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी संयुक्तरीत्या एक भव्य आणि विचारप्रवृत्त उद्योजकता परिषद साजरी केली. या कार्यक्रमाचे आयोजन भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे, महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे आणि अभियांत्रिकी महाविद्यालय, लवळे यांनी संयुक्तपणे केले होते.प्रमुख वक्ते डॉ. योगेश पवार यांनी "दाहक इच्छाशक्ती" या संकल्पनेवर आधारित अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेल्या आत्मबळ, नैतिक मूल्ये आणि दूरदृष्टी यांचे महत्व पटवून दिले.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. के. डी. जाधव, सहकार्यवाह, भारती विद्यापीठ, यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “शिक्षण ही केवळ माहिती नव्हे, तर चारित्र्य घडवणारी शक्ती असावी.”कार्यक्रमात श्री. राहुल बनकर, श्री. करण अंतुरकर आणि सौ. शीतल कनसे या नवउद्योजकांनी आपापल्या प्रेरणादायी यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. त्यांनी धैर्य, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे आपल्या अनुभवातून स्पष्ट केले.कार्यक्रमास प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील आणि प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एकमुखाने नमूद केले की, “ज्ञान, मूल्य, दृष्टिकोन आणि सामूहिक प्रयत्न यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उद्याचे सक्षम नेतृत्व घडवणे हेच आमचे ध्येय आहे.”
प्रा. प्रणोती काळे आणि प्रा. केतकी माळगी यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून नेटके नियोजन केले. या परिषदेत तिन्ही महाविद्यालयातील ५६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परिषदेत सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विभाग प्रमुख आणि उपप्राचार्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या अनुभवांमध्ये आत्मभान, प्रेरणा आणि कृतज्ञतेचा ठसा स्पष्टपणे जाणवत होता. चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि नव्या उमेदेचे तेज, त्यांच्या पुढील प्रवासातील यशाची नांदी ठरली.ही गुरुपौर्णिमा केवळ एक परंपरा नव्हती, तर नवदृष्टी, नवचैतन्य आणि उद्योजकतेच्या पायाभरणीचा एक प्रेरणादायी सोहळा ठरली.