पुणे : पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसला राम राम ठोकत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली होती. दरम्यान त्यांनी सोमवारी भाजपच्या पक्षप्रवेशाची घोषणा करताना 'भाजपसोबत बिना हुंड्याचं लग्न केलंय' असे वक्तव्य केले होते. जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे.
सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी सासवडमध्ये भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संजय जगताप यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना संजय जगताप म्हणाले, पक्षप्रवेशाला वेळ झाला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहायला उशीर झाला त्यासाठी दिलगीरी व्यक्त करतो, उर्वरीत पक्षप्रवेश काही वेळाने पूर्ण होतील. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो असंही जगताप म्हणालेत.
माझ्या स्वभावात दोष आहे मी कायम उशीरा पोहोचतो त्यासाठी यावेळी जगताप यांनी दिलगिरी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि भाजपची साथ आपल्याला लाभली आहे, असंही यावेळी कार्यक्रमात संजय जगताप यांनी म्हटलं आहे.
भाजपसोबत बिना हुंड्याची सोयरीक
भाजपसोबत आम्ही बिना हुंड्याचं लग्न केलं आहे. माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही अशी प्रतिक्रिया संजय जगताप यांनी म्हटले होते. तसेच भाजपमध्ये प्रवेश करताना मला कोणते पद हवे आहे यासंदर्भात चर्चा झालेली नाही. त्या उलट पुरंदर विधानसभा मतदारसंघातमधील विकास कामांसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला मिळाले आहे. अशी माहिती सोमवारी घेण्यात आलेल्या मेळाव्यात देण्यात आली आहे.
तसेच, पक्षात प्रवेश करताना कोणताही वैयक्तिक अथवा पारिवारिक स्वार्थ नाही. पक्ष प्रवेश करताना कोणतीही मागणी केली नसून जी भाजपसोबत सोयरीक ठरली आहे ती बिगर हुंड्याची आहे. आगामी काळा भाजपकडून कोणतेही पद मी स्वीकारणार नसून थेट २०२९ ची विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.
काँग्रेसमध्ये संवादाची कमतरता
१९८० पासून माझे वडील हे काँग्रेससोबत सलग्न आहेत. पूर्वी काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्य दिसत होते. मात्र, काही काळापासून त्यामध्ये बदल झाल्याचे दिसत आहे. पक्षातील संवाद कमी झाला आहे. कुठल्याही संघटनेमध्ये संवाद महत्त्वाच असतो. मात्र, त्या संवादाची कमतरता कुठेतरी काँग्रेसमध्ये जाणवत आहे. त्यामुळे तुलनेने चांगली संघटन असलेल्या भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे जगताप म्हणाले आहेत.