मुंबई : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार आहे. या बारवर धाड टाकून २२ बारबाला ताब्यात घेण्यात आल्या होत्या, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे. शिवाय डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे?” असा सवाल देखील अनिल परब यांनी सभागृहात उपस्थित केला आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.
अनिल परब नक्की काय म्हणाले?
मुंबईतील कांदिवली येथे सावली बार आहे. पोलिसांनी या बारवर धाड टाकली त्यावेळी 22 बारबाला सापडल्या. शिवाय 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना त्यावेळी ताब्यात घेण्यात आलं. कस्टमरवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पंचनामा करण्यात आला. त्या बारचे परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याचं समोर आलं. त्या गृह मंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असा दावा परब यांनी केला आहे.
एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? असा सवाल करत त्यांनी आजच्या आज गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. अजित पवार तुम्ही योग्य ती कारवाई कराल. मुख्यमंत्री गृहमंत्रिपद सांभाळतात त्यांनी गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर सरकारचा त्याला पाठींबा आहे, असं सिद्ध होईल. सध्या शरमेने मान खाली जातं आहे. आज बिहारमध्ये तुमचा महाराष्ट्र बिहार झाला आहे का? असं म्हटलं जात आहे. गृहराज्यमंत्र्यांकडून कायदे पायदळी तुडवले जातं असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
विधान परिषदेत अनिल परब पुढे म्हणाले की, आज आम्ही राज्यपालांकडे आम्ही गेलो होतो. त्याठिकाणी आमच्या पीएला खाली उतरवलं? का उतरवलं तर म्हणाले की राज्यपालांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. आता राज्यपाल सुरक्षित नसतील तर जनसुरक्षा विधेयक चाटायचं आहे का? काल विधीमंडळात राडा झाला, हाणामारी झाली, आमदार सुरक्षित नाहीत. सचिन पाटील नावाचा आरटीओ अधिकारी आहे, त्याचा ड्रायव्हर कंत्राटी होता. त्याचं कंत्राट संपलं आहे तरी हा ड्रायव्हर आहे. अधिकाऱ्याचे कपडे घालून चलन कापत आहे. तो अधिकारी गाडीत बसतोय आणि त्याचा ड्रायव्हर मशीन हातात घेऊन चलन काढत आहे. त्याचे मी फोटो पाठवतो, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.