सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • नांदेड जिल्ह्यात पावसाने उडवली दानादान; नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस.
  • परभणीच्या पालम तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली; 9 गावांचा संपर्क तुटला
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 जिल्हा

स्मार्ट व इंटेलिजंट गावांकडे महाराष्ट्राची वाटचाल; ‘सातनवरी’ ठरले देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव

डिजिटल पुणे    29-08-2025 15:40:15

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्यांकडे परत चला’ असा संदेश देत ग्रामीण भारताचे देश विकासात महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ‘गाव करी ते राव न करी’ असे सांगून एका आदर्श ग्रामीण भारताची संकल्पना ‘ग्रामगीता’ या ग्रंथातातून मांडली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व व पुढाकाराने या ग्रामीण भारताचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्मार्ट व इंटेलिजंट होण्याच्या दृष्टीने पाऊल पुढे पडले आहे. नागपूर ग्रामीणमधील सातनवरी गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रायोगिक तत्वावर नुकतेच देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट गावाचा शुभारंभ केला. स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे किटकनाशके व खत फवारणी, मत्स्यव्यवसाय, सिंचन, आरोग्य, शिक्षण, बँक ऑन व्हिल, स्मार्ट टेहळणी आदी 18 सेवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या व मुख्यत्वे भारतीय कंपन्यांद्वारे पुरविल्या जात असल्याने हे एक आत्मनिर्भर भारताद्वारे समृद्ध गाव करण्यासाठीचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

महाराष्ट्राने भारत देशाला स्वातंत्र्य करण्यात व येथील सामाजिक उत्थानासाठी मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्योत्तर भारताला रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, महिलांना आरक्षण असे क्रांतीकारी पाऊल उचलत पुढे देशभर त्याची अंमलबजावणी झाली आहे. महाराष्ट्राने देशाला दिलेल्या या महत्वाच्या योगदानात आता स्मार्ट व इंटेलिजंट गावाची भर पडणार आहे. देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट गावाचा शुभारंभ करतांनाच राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील 10 असे सुमारे 3 हजार 500 गावे पहिल्या टप्प्यात स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा मनोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलवून समृद्ध गावांद्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या 100 वर्षपूर्ती निमित्त संपूर्ण विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या पहिल्या संबोधनात ग्रामीण भारत तंत्रज्ञानाद्वारे विकास पथावर अग्रेसर करण्याची घोषणा करत ‘भारतनेट’ हा गावा-गावांना इंटरनेटद्वारे जोडण्याचा व पर्यायाने जगाशी ग्रामीण भारताचा संवाद घडविण्यासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रात भारतनेट उपक्रमांतर्गत 2019 मध्ये पहिल्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी झाली व दुसऱ्या टप्प्यासही सुरूवात झाली. राज्याने भारतनेटच्या धर्तीवर ‘महानेट’ कार्यक्रम हाती घेत त्याची अमंलबजावणीही सुरू केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने विविध महत्वाचे निर्णय घेऊन राज्याला सर्व क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी पुढाकार घेतला असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराद्वारे प्रशासनाला गती व सर्व सामान्यांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही निर्णय घेण्यात आले.  ग्रामीण महाराष्ट्रालाही उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व पर्यायाने गावातील सामान्य माणसाला सबळ करण्यासाठी स्मार्ट व इंटेलिजंट बनविण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम मुख्यमंत्र्यी श्री. फडणवीस यांनी हाती घेतला.

आत्मनिर्भर भारताद्वारे समृद्ध गाव

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतातच देशवासियांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता सर्व क्षेत्रांना आवाहन करत आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली. याला प्रतिसाद देत देशात विविध क्षेत्रांमध्ये देशी बनवाटीच्या वस्तू व तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. याच दिशेने एक पाऊल पुढे जात केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेसने (व्हाईस) देशांतर्गत कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत देशातील स्मार्ट इंटेलिजंट गाव बनविण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष ठेवला व त्यास तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत हा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्याचे ठरले. त्यानुसार व्हाईस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची भेट घेतली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक होवून हा प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक असलेली भौगोलीक व अनुषांगिक सर्व सज्जता असलेल्या नागपूर ग्रामीण मधील गटग्रामपंचायत सातनवरी या 1800 लोकवस्तीच्या गावाची निवड देशातील हा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यासाठी झाली व त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

गेल्या दोन महिन्यापासून स्थानिक प्रशासनाने आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि व्हाईस कंपनीने सातनवरी गावात मुक्काम ठोकला व या गावाला स्मार्ट इंटेलिजंट गाव बनविण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करण्याच्या दिशेने काम झाले. या प्रकल्पाच्या प्रगतीचा  मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी व व्हाईस कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घेतला.

असे होत आहे सातनवरी स्मार्ट व इंटेलिजंट

सातनवरी गाव इंटरनेट सुविधांनी पूर्णपणे जोडण्यात आले आहे. वायफाय, हॉटस्पॉट आदींचा उपयोगही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ग्रामपंचायत ते गावातील घरे, संस्था आणि गावात वायफाय, फायबर टु द होम (फटीटीएच), सॅटेलाईट सुविधा, 4 जी, 5 जी व अन्य वायरलेस तंत्रज्ञानाचा उपयोग करून ब्रॉडबॅन्डची उपलब्धता मोठ्या प्रमाणात करून देण्यात आली आहे.  स्मार्ट शेतीला प्राधान्य देवून गावातील शेतांमध्ये सेन्सर बसविण्यात आले आहे. याद्वारे शेतीतील पेरणीपासून कापणीपर्यंत तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, माहिती, पीक पद्धतीचे नियोजन आदी सर्व माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध झाली आहे. या गावातील शेतकरी ड्रोन व सेंसर आदींचा उपयोग करून माती परिक्षण, फवारणी, खते आदींच्या योग्य नियोजनाद्वारे पर्यावरणपूरक शेतीसह उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याच्या दिशेने अग्रेसर झाले आहे. तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने गावकऱ्यांचे आरोग्य सुधारत आहे. हेल्थ कार्ड, टेलिमेडिसिन आदींचा उपयोग होवून गावातच आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होत आहे व शहरांकडे होणारी गावकऱ्यांची पायपीट आता थांबत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर या उपक्रमामध्ये सहभागी होवून ग्रामस्थांना आरोग्य सुविधांचा लाभ देत आहेत.  गावात प्राथमिक शिक्षणात कृत्रिम बुद्धीमत्ता व स्मार्ट शिक्षणाचा उपयोग होवून वैश्विक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत आहे. शाळा व अंगणवाडीमध्ये स्मार्ट ईसीसीई व्हिडियो मार्गदर्शन पुस्तक, ए.आय. च्या माध्यमातून रिमोट क्लास रूम तसेच डिजिटल अंगणवाडी केंद्र या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या गावात ई-स्कील सेंटर, मोबाईल हेल्थ कनेक्टिविटी आदी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. संगणकामुळे ग्रामपंचयातमधील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होत आहेत. तसेच ग्रामस्थांना वायफायच्या माध्यमातून गाव व शहराशी जोडणे सुलभ झाले आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, तलावांमधील मत्स्यपालनासाठी आवश्यक असलेल्या पाण्यातील घटकांची माहिती डॅशबोर्डवर दिसत आहे.  ग्रामपंचायतीने स्मार्ट पथदिवे लावले असून यामुळे विजेची बचत होत आहे. स्मार्ट कॅमेरांचा उपयोग करून गावात ठिकठिकाणी टेहळणी सुरू आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून गावातील पेयजल वितरण व गुणवत्ता नियमन करण्यात येत आहे. स्मार्ट गर्व्हनन्स, स्मार्ट कचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट अग्निशमन व्यवस्था उभारण्यात आली आहे.

तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे जगात विविध क्षेत्रात क्रांती घडत आहे. भारतातही तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वदेशी कंपन्यांनी एकत्र येवून समृद्ध गावाचा आदर्श निर्माण करण्याचा ध्यास धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पास पूर्ण सहकार्य देवून देशाला दिशादर्शक ठरेल असे सातनवरी गाव स्मार्ट व इंटेलिजंट करण्यासाठी स्थानिक प्रशासन व राज्य शासनाची संपूर्ण मदत दिली. त्यातून उभे राहिलेले हे गाव आता प्रगतीच्या वाटेवर आरूढ झाले असून आधुनिक जगातील एक आदर्श गाव म्हणून सातनवरी नक्कीच आपली ओळख भारतासह जगाला करून देईल याची खात्री पटते.


 Give Feedback



 जाहिराती