पुणे : पुणे शहरातील वाढत्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थापनासाठी सिंहगड रस्त्यावरचा तीन टप्यातला अडीच किलोमीटरचा पुल हा अत्यंत महत्वाचा असून या पुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडी मधून तर सुटका होणारच आहे. याबरोबरच प्रदूषण कमी होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांसाठी ही भेट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाच्या लोकार्पणानंतर सांगितले.
सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला राजाराम पुलापासून ते फन टाईम थिएटरपर्यंतचा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास, परिवहन आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सर्वश्री भिमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.
सिंहगड रस्त्यावरून धायरी, नऱ्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी तसेच बेंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दररोज सुमारे दीड लाखाहून अधिक वाहनांची वाहतूक होते. या मार्गाच्या एका बाजूला मुठा नदी व दुसऱ्या बाजूस डोंगर असल्याने पर्यायी रस्ता शक्य नसल्यामुळे उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. पुणे महानगरपालिकेमार्फत उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २१ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले.
हा उड्डाणपूल तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सिंहगडकडून स्वारगेटकडे जाणारा ५२० मीटर लांबीचा राजाराम पूल चौकातील उड्डाणपूल (खर्च रु. १५ कोटी), दुसऱ्या टप्प्यात विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरदरम्यानचा स्वारगेटकडून सिंहगडकडे जाणारा २.१ किमी लांबीचा उड्डाणपूल (खर्च रु. ६१ कोटी) आणि तिसऱ्या टप्प्यात वीर शिवाजी काशीद चौक ते कै. प्रकाश विठ्ठल इनामदार चौकदरम्यानचा सिंहगडकडून स्वारगेटला जाणारा १.५ किमी लांबीचा उड्डाणपूल (खर्च रु. ४२ कोटी) उभारण्यात आला. या तीनही टप्प्यांसाठी एकूण ११८.३७ कोटी रुपये खर्च आला आहे.
तीस मिनिटाचा कालावधी आता सहा मिनिटावर
पूर्वी राजाराम पूल ते फन टाईम थिएटर या २.६ किमी अंतरावरील सहा चौक पार करण्यासाठी ३० मिनिटांचा कालावधी लागत होता. नव्या उड्डाणपुलामुळे हा वेळ आता केवळ ५ ते ६ मिनिटांवर आला आहे. पुलाखालील रस्त्याचे सुयोग्य विकसन करून दोन्ही बाजूस तीन लेनची वाहतूक क्षमता, प्रशस्त पदपथ आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
तसेच दुभाजकाचे सुशोभीकरण सीएसआर अंतर्गत दोन एजन्सींमार्फत पूर्ण करण्यात आले असून, त्याची देखभाल पुढील पाच वर्षे त्यांच्याच माध्यमातून होणार आहे.या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
