अहिल्यानगर – गाव समृद्ध झाले तरच राज्याचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीरित्या राबवून जिल्हा राज्यात अभियानात अग्रेसर राहील, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा आज सुखकर्ता लॉन्स येथे उत्साहात पार पडली. यावेळी सभापती प्रा. शिंदे बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार विठ्ठलराव लंघे, पद्मश्री पोपट पवार, यशदाचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, प्रत्येक गावाला वीज, पाणी, शिक्षण, रस्ते यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पंचायतराज व्यवस्थेमार्फत केले जाते. विविध अभियान व योजनांच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावाच्या विकासाची मोठी संधी मिळाली आहे. या संधीचं सोने करत आपले गाव समृद्ध करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानात हिरिरीने सहभाग नोंदवावा.
अभियानात तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या पंचायत समितीस १५ लाख रुपये, जिल्हास्तरावर ५० लाख रुपये, विभाग स्तरावर १ कोटी रुपये तर राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या पंचायत समितीस ५ कोटी रुपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.
सक्षम ग्रामपंचायतींवरच महाराष्ट्राचा विकास अवलंबून –पालकमंत्री डॉ. विखे पाटील
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, गाव पातळीवर पाणी, रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षणाचा दर्जा उंचावणे हेच या अभियानाचे उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायती लोकशाहीची पहिली पायरी असून त्या सक्षम झाल्या तरच खऱ्या अर्थाने समृद्ध महाराष्ट्र घडेल. प्रत्येक गावाने आपला विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.
राज्य शासनामार्फत अनेकविध विकासाच्या योजना राबवल्या जातात. या योजनांची माहिती घेऊन त्यांची आपल्या गावात अंमलबजावणी करण्याची गरज आहे. शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी तालुकास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करावे. गावातील जनजीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी हे अभियान राबविण्यात यावे. प्रत्येक गावाने स्वच्छतेला अधिक महत्त्व देऊन वैयक्तिक शौचालयांची अधिकाधिक उभारणी करून हागणदारीमुक्त होणे आवश्यक आहे, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
आमदार श्री.पाचपुते म्हणाले, गाव हा विकासाचा केंद्रबिंदू असून वेळेप्रमाणे बदल घडवत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. बांबू शेती ही शाश्वत उत्पन्न देणारी असून यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने संधीचं सोनं करून गावाच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार श्री. दाते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे गावे सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातात. हिवरेबाजार व राळेगणसिद्धी या ग्रामपंचायतींचा आदर्श घेत योजना ठराविक कालावधीसाठी न राबवता त्या सातत्याने व सेवाभावाने राबवाव्यात. गाव समृद्ध करणारे हे अभियान प्रत्येक गावात राबवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आमदार श्री.लंघे म्हणाले, त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतून गावाच्या विकासाला प्राधान्य दिले जाते. ग्रामपंचायतीनी कर वसुलीला प्राधान्य द्यावे. स्पर्धेच्या युगात ग्रामपंचायती सक्षम करण्याची आवश्यकता आहे. वृक्षारोपणालाही प्राधान्य दिले जावे, असे ते म्हणाले.
पद्मश्री पवार म्हणाले, विविध अभियानांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी प्रयत्न होत आहेत. संधी म्हणून या अभियानाकडे पाहून प्रत्येकाने उत्साहाने सहभाग नोंदवावा. पंचायतराज व्यवस्था ही गावाच्या विकासाची खरी नांदी असल्याचेही ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भंडारी प्रास्ताविकात म्हणाले, राज्याला अभियानाची मोठी परंपरा आहे. अभियानाच्या माध्यमातून अनेक ग्रामपंचायती आदर्श ठरल्या आहेत. गावाच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीची करवसुली ९० टक्क्यांपर्यंत व्हावी. जिल्ह्यात २८ हजार महिला बचत गटांतून ३ लाख महिला कार्यरत असून त्यांना सहभागी करून ग्रामसभा बळकट करावी. कचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर देऊन या कामाला प्राधान्य द्यावे. पर्यावरण लक्षात घेऊन वृक्षारोपणाला प्राधान्य द्यावे. उपजीविकेच्या बाबतीत ग्रामपंचायतीने काम करून प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करून द्यावा. सौरऊर्जा, ऑनलाईन सेवा व पारदर्शक कारभारासह गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा. या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी होऊन राज्यात जिल्ह्याचा प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.यावेळी उत्कृष्ट पंचायत समिती व ग्रामपंचायतींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यशाळेस सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.