सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : पुण्याची मिरवणूक सुरू! मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...
  • वनराज आंदेकरच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा बळी
  • पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणार, संशयितांवर ठेवणार करडी नजर , शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत
  • मिस्टर अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त? तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही; संजय राऊतांचा घणाघात
 जिल्हा

शिक्षकांनी ज्ञानदानातून सक्षम पिढी घडवून विकसित भारताची संकल्पना साकार करावी – प्रा. राम शिंदे

डिजिटल पुणे    06-09-2025 10:26:10

अहिल्यानगर – शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसंस्कार व नवी दिशा देण्याचे काम शिक्षक करतात. विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी शिक्षकांनी ज्ञानदानातून सक्षम पिढी घडवावी. शिक्षण क्षेत्रात जिल्हा राज्यात अव्वल राहण्यासाठी अधिक प्रयत्न करा, असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

शहरातील द्वारका लॉन्स येथे जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२२, २०२३ व २०२४ या वर्षातील जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड, दिलीप भालसिंग, अनिल मोहिते, विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनाची व विचारांची ज्योत प्रज्वलित करणारे, त्यांच्या कलागुणांना वाव देणारे, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारे हे शिक्षकच असतात. नवीन पिढी घडविण्याचे कामही शिक्षक करत असतात. यामुळेच समाजामध्ये शिक्षणाला अधिक महत्त्व आहे. ग्रामीण भागामध्ये शिक्षण व समाजजीवन हे दीपस्तंभ ठरते. गावातील सामाजिक क्रांती घडविण्याचे कार्य ज्ञानदानातून शिक्षक करत असतात. समाजामध्ये शिक्षकांना मोठा मान आहे. नवी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांमार्फत होत असल्याने समाजाचे शिल्पकार हे शिक्षकच आहेत.

शिक्षण हे केवळ करिअर घडविण्याचे साधन नसून जीवन जगण्याची दिशा देणारी प्रक्रिया आहे. नव्या शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी आपले ज्ञान व अध्यापन पद्धती अद्ययावत ठेवली पाहिजे. राज्यात शिक्षणक्षेत्रात जिल्हा ५ व्या क्रमांकावर आहे. जिल्हा राज्यात अग्रेसर रहावा, यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही‌ त्यांनी सांगितले.

शिक्षक हा राष्ट्र व समाजाच्या उत्कर्षाच्या प्रक्रियेतील प्रमुख घटक – पालकमंत्री डॉ.विखे पाटील

पालकमंत्री डॉ.विखे पाटील म्हणाले, विविध आव्हाने समर्थपणे पेलून, शिक्षण परिघाच्या पलीकडे जाऊन शिक्षकांनी प्रयोगशीलतेतून ज्ञानदान केले व त्यामुळे जिल्ह्याचा नावलौकिक राज्यभर वाढवला. ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. शिक्षक हा राष्ट्र व समाजाच्या उत्कर्षाच्या प्रक्रियेतील प्रमुख घटक आहे.

शाळांतून दिलेल्या ज्ञानदानातूनच राष्ट्र व समाजाच्या भवितव्याची दिशा तरुण पिढी ठरवणार आहे. ज्ञानाचा कक्षा रुंदावतांना शिक्षक विद्यार्थ्यांसाठी शिडी धरतात व विद्यार्थी उद्याची वाटचाल करतात. शिक्षकांशिवाय राष्ट्राची व समाजाची प्रगती अशक्य असल्याने ज्ञानाची साधना अखंडपणे सुरू ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

आजघडीला आधुनिक तंत्रज्ञानावरील शिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शैक्षणिक पद्धतीमध्ये होणाऱ्या बदलांचे शिक्षकांपुढे मोठे आव्हान असून शिक्षकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. ज्ञानाने समृद्ध झालेला आपला देश असून या ज्ञानदानाचे काम अत्यंत समर्पित भावनेतून शिक्षकांकडून व्हावे, अशी अपेक्षाही श्री.विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, जिल्ह्याच्या अनेक खासगी संस्थेमधून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे व हे केवळ शिक्षकांमुळे शक्य झाले आहे. केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देणे एवढेच शिक्षकांचे कार्य नसून समाजाला साक्षर व सुशिक्षित करण्याची जबाबदारीही शिक्षकांचीच असल्याचेही ते म्हणाले.

आमदार काशिनाथ दाते म्हणाले, खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदांच्या शाळांमधून अधिक दर्जेदार शिक्षण मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील अनेक विद्यार्थी प्रशासनामध्ये मोठ्या पदावर काम करत असून ही अत्यंत भूषणावह बाब असल्याचे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, अत्यंत दुर्गम भागात शाळा असतानाही येणारी आव्हाने पेलून समाजातील गोरगरीबांच्या पाल्यांना शिक्षणदानाचे मोठे कार्य शिक्षकांमार्फत केले जाते. शिक्षकांच्या या कामातून इतरांनीही प्रेरणा घ्यावी. शाळांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात आनंद भंडारी म्हणाले, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५३४ प्राथमिक शाळांच्या माध्यमातून २ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध उपक्रम राबवत या शाळांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. मिशन आपुलकी, मिशन आरंभ हे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जात असून याद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता उंचावत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शाळांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्हा शिक्षक पुरस्कारांची निवड उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांची अत्यंत पारदर्शकपणे करण्यात आली आहे.

यावेळी सन २०२२, २०२३ व २०२४ या वर्षातील जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती