पुणे : मराठी नाट्य, सिने क्षेत्रातील दिग्गज कलाकार भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर आणि संपदा जोगळेकर हे त्यांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे जेंव्हा ते मराठी नाटक व चित्रपट क्षेत्रात पदार्पण करताना खूप स्ट्रगल करत होते. त्या काळात त्यांना घेऊन देवेंद्र पेम ह्या नवतरूण युवकाने लिहिलेले एक नाटक निर्माण करण्याचा विचार केला. त्यांनी नाटकाचे नाव “अॅाल दी बेस्ट” असं ठेवलं. त्या नाटकाची कहाणी, स्क्रिप्ट नेहमीच्या कथे प्रमाणे नव्हती. अॅाल दी बेस्ट ह्या नाटकात तीन नायक व एक नायिका असे चार पात्राचे नाटक होते, त्यात तीन पुरुष नायक हे एकमेकांचे खूप जवळचे मित्र आणि ते एकत्रच एका घरात राहत असत.
ह्या तिघांपैकी एक अंधळा, एक बहिरा व एक मुका असे होते. अंधळा बघू शकत नाही, पण त्याला ऐकायला व बोलायला येत असे, बहिरा त्याला ऐकायला येत नाही पण तो बघू शकतो व बोलताही येते आणि तिसरा मुका त्याला ऐकायला येते, तो बघू ही शकतो पण बोलता येत नाही. असे तीन कलाकार मग कथानक तरी कसे असेल व ते पुढे तरी कसे सरकणार ? पण देवेंद्र पेम ह्यांच्या मनात एक वेगळाच विचार चमकत होता. कथानक तर पुढे सरकत असणं आवश्यक असल्याने व ते कथानक मायबाप प्रेक्षकांना कसे आवडेल ह्याचा पूर्ण विचार करूनच देवेंद्र पेमने एक स्त्री पात्र कथेत घेतले. मग हे तीन अंधळा, बहिरा व मुका हे मित्र एकाच मुलीच्या म्हणजे मोहिनी या मुलीच्या प्रेमात पडतात मग ते प्रेम तिच्याकडे कसे व्यक्त करतात, ते ही दुसऱ्याला न कळता, त्याची अशी काही सांगड घातली की मायबाप प्रेक्षकांची उत्सुकता, व त्यातील पात्रांच्या रंगभूमीवरचा वावर ह्यामुळे अनेक विनोदी प्रसंग घडतात ते पाहून प्रेक्षक नाटकाच्या सुरुवाती पासूनच खिळवून ठेवण्यात एक लेखक व दिग्दर्शक म्हणून देवेंद्र पेम कमालीचे यशस्वी झाले होते.
आणि त्यांना त्यावेळचे नवखे पण दमदार अभिनय असलेले कलाकार भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर आणि संपदा जोगळेकर ह्यांनी ह्या नाटकात जीव ओतून काम केले व त्यामुळे “अॅाल दी बेस्ट” हे नाटक त्यावेळी मायबाप प्रेक्षकांना खूप आवडले व त्यामुळेच ते खूप लोकप्रिय झाले, गाजले व सुपरडुपर हिट ठरले. आणि मराठी नाटक व चित्रपट क्षेत्रासाठी चारही दमदार कलाकार लाभले व देवेंद्र पेम सारख्या एक तरुण व उत्कृष्ट लेखक व दिग्दर्शक मिळाला. विशेष म्हणजे हे नाटक इतके लोकप्रिय झाले व महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणावरून नाटकाची डिमांड येत होती. पण एकच संच असल्याने प्रत्येक ठिकाणी हे पोहचवता येत नव्हते. म्हणून कल्पक मनाच्या देवेंद्र पेम ह्याने वेगवेगळे कलाकार घेऊन ह्या नाटकाचे तीन/चार संच तयार केले. आणि हे नाटक महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी प्रदर्शित होऊ लागले. हा एक जागतिक विक्रमच म्हणायला हवाय.
कालांतराने हे सदाबहार नाटक नवनवीन कलाकारांना घेऊन प्रदर्शित होत आहे. आता ह्या नाटकाचा ५००० प्रयोगाचा टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गांवर आहे.
देवेंद्र पेम ह्यांनी हे नाटक पुन्हा सुरू केले आहे. या नाटकाच्या नविन संचात विजय (आंधळा) हे पात्र निखिल चव्हाणने, तर चंद्रकांत उर्फ चॅंग (बहिरा) मनमित पेम व दिलीप (मुका) मयुरेश पेम ह्यांनी साकारले असून, ह्या तिघांना सांभाळून घेणारी मोहिनी ही नायिका वनमाला वेंदे हीने सुंदररित्या साकारली आहे.
ठाण्याचा प्रयोग तर नेहमीच हाऊसफुल होत असतो. मी माझ्या संपूर्ण फॅमिलीसह ह्या नाटकाचा प्रयोग पाहिला. माझा ११ वर्षांचा नातू अनिश हा पण होता. तसेच आमच्या सोबत सुप्रसिद्ध अभिनेता सुनिल तावडे, शुभंकर तावडे आणि सोनाली तावडे ही फॅमिली पण होती.
एक आंधळा, एक बहिरा व एक मुका कसे बरे एकमेकांशी संवाद साधत असतातील हा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण नाटक बघताना त्या तिघांची धडपड, धावपळ पाहून अख्खे थिएटर प्रत्येक सीनला एक तर हश्शाचा आवाजात किंवा आश्चर्याच्या धक्क्याने आ वासून बघत होते. माझा नातू अनिश तर खुर्चीवर उड्या मारून हसत होता.
एक प्रसंग तर असा होता की, विजय (अंधळा) नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसणार असतो, पण त्या ठिकाणी खुर्ची नसतेच, खुर्ची खूप लांब असते, विजयला दिसत नसल्याने तो खाली च पडला असता, पण ते लक्षात येताच चंद्रकांत उर्फ चॅंग(बहिरा) व दिलीप (मुका) हे दोघे विजयच्या बाजूने खुर्ची अशी फेकतात की विजय अगदी सहज त्या खुर्चीवर बसतो. हा सीन पाहून सगळे प्रेक्षक आश्चर्यचकित होऊन पहिल्यांदा मंत्रमुग्ध होतात आणि लगेच सगळे उठून त्या सीनला टाळ्यांच्या कडकडाटात दाद देतात. तसेच दुसऱ्या प्रसंगात मुका (दिलीप) म्हणजे मयुरेश पेम ह्याने मोहिनीवर आपले कसे आणि किती प्रेम आहे हे व्यक्त करतानाचा प्रसंग तर असा काही रंगवला आहे की, ते पाहताना धमालच येते.
तर हे तिघे अंधळा, बहिरा व मुका हे तिघे एकाच मुलीच्या प्रेमात पडतात व तिला पटवण्यासाठी अनेक तऱ्हेने प्रयत्न करत असतात, धडपडत असतात. ते ही एकमेकांना कळू न देता. पण शेवटी ती मुलगी विजयला (अंधळा) की चॅंगला (बहिरा) की दिलीपला (मुका) कोणाला पटते ? ती कोणाची निवड करते ? त्यांचं लग्न होत कां ? ह्याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता निर्माण होते. प्रत्येक क्षणाला प्रेक्षकांच्या मनातच तिघांची शर्यत सुरू होत असते. जो तो तिला पटवायचा प्रयत्न करत असतो. पण शेवटी त्या तिघांपैकी कोण यशस्वी होतो ? हे तर नाटक पाहून समजण्यातच मज्जा घेता येईल.
निखिल चव्हाण ह्याने अंधळ्याची भुमिका तर उत्कृष्ट केली आहेच, पण मयुरेश पेमने मुक्याने बोलताना हो बोलतानाच काय हावभाव केले आहेत त्याला तोडच नाही, मनमित पेमने बहिरा साकारताना त्याच्या स्थूल शरीराचा असा काही उपयोग केला आहे की त्याला बघतच बसावे असे सर्वच प्रेक्षकाना वाटते. तसेच वनमाला वेंदेने ह्या तिघांना कसे खेळवत ठेवले हे खरंतर थिएटरमध्येच पाहण्यात मज्जा आहे.

प्रदीप पाटील ह्यांचे नेपथ्य हे किती सुंदर आहे ते पडदा उघडताच समजते. वेशभूषा मेकअप चैत्राली डोंगरे व प्रशांत खंदारे अगदी व्यवस्थित केले आहे. आणि संगीत वेदांत जोग यांनी चोख पद्धतीने केले आहे.
नाटकातील अनेक प्रवेश हे शितल तळपदेच्या प्रकाश योजनेने अगदी सहज तळपून जातात. देवेंद्र पेम ह्यांचे
ह्या नाटकाचे लेखन तर उत्तमच आहे पण दिग्दर्शक म्हणून त्यांनी धमालच केली आहे. उगाच हे नाटक कित्येक वर्षे म्हणजे ३२ वर्षा पूर्वी पासून मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे.
आता तर देवेंद्र पेम ह्यांना त्यांची मुले मनमित व मयुरेश ह्यांची साथ लाभली आहे.
अॅाल दी बेस्ट हे नाटक ७/८ वर्षांच्या लहान मुलापासून ते अगदी ऐंशी वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत अगदी संपूर्ण कुटुंबाने एकत्रित पाहण्यासारखे हे नाटक आहे.
मग बघताय नां “अॅाल दी बेस्ट” नाटक !!
ह्या नाटकाची जाहिरात बघून नक्की जा जवळच्या थिएटरमध्ये आणि नातवांसह करा धमाल, मस्ती मज्जा !!!
अॅाल दी बेस्ट
नाट्य परिक्षण :
दिपक बजरंग नलावडे
(नाट्य व सिने निर्माता)
