उरण : पनवेल तालुक्यातील उलवे येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रविण राम ठाकूर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजितदादा पवार गट )मध्ये पक्षप्रवेश केला आहे.उलवे येथील प्रवीण राम ठाकूर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार तथा मंत्री सुनिल तटकरे,रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून, गीताबाग सुतारवाडी, रोहा तालुका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकि दरम्यान जाहिरपणे पक्ष प्रवेश केला.यावेळी महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, जेष्ठ कार्यकर्ते अंकुश खडस,कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, कार्याध्यक्ष सुभाष केकाने,सोशल मीडिया रायगड जिल्हा अध्यक्ष विलास वसंत यादव,उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, उरण तालूका अध्यक्ष परीक्षित ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.प्रविण राम ठाकूर यांनी पक्ष प्रवेश करताच त्यांच्यावर रायगड जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसे अधिकृत नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले. दांडगा जनसंपर्क,अभ्यासू व्यक्तिमत्व, विविध समस्या सोडविण्याचे कौशल्य हे प्रवीण राम ठाकूर यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. आजपर्यत केलेली विविध विकासकामे, सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रायगड जिल्हा सरचिटणीस पदी करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रवीण राम ठाकूर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवीण राम ठाकूर यांची केलेली नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. प्रवीण राम ठाकूर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्य व विचार तळागाळात पोहोचविण्यास कटीबद्ध असून त्यांच्या नियुक्ती मुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणण्यात प्रवीण ठाकूर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.