मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही हाताला काम आणि समृद्धीची हमी देणारी योजना आहे. ग्रामीण भागाला रोजगार व आर्थिक बळकटी देऊन कुटुंबाला आणि गावाला समृद्ध करण्यासाठी मनरेगा अंतर्गत कामांना गती देऊन वेळेत पूर्ण करा, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले.
राज्यातील मनरेगा कामांची प्रगती आणि जिल्हास्तरावरील अडचणी याबाबत मंत्री गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रोहयो विभागाचे सचिव गणेश पाटील, मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, तसेच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, संबधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मंत्री श्री. गोगावले म्हणाले, केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी ठरवून दिलेल्या मनुष्यदिन निर्मितीच्या उद्दिष्टांपेक्षा अधिक संख्येने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. लवकरच विभागनिहाय विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.बैठकीत मनरेगा कामकाजाला नवी दिशा, गती आणि दृष्टी देण्यासाठी योजनांची अंमलबजावणी, निधी मंजुरी, तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय कार्यवाही याबाबत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.