मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यटन विभागामार्फत राज्यातील ७५०० युवांना प्रशिक्षण देण्याचा ‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’ व पर्यटकांना सुविधा देणारे ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र’ पाच ठिकाणी उभारण्यात येणार आहे. ‘नमो पर्यटन’ उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देत, जागतिक पर्यटकांना आकर्षित करेल. हा उपक्रम महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रातील नवा मैलाचा दगड ठरेल. हा उपक्रम प्रधानमंत्री यांच्या सर्वसमावेशक आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचे मूर्त स्वरूप आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मेघदूत बंगला येथे आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री देसाई बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’: स्थानिकांना सक्षम बनवणे या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत ७ हजार ५०० स्थानिक युवक-युवतींना आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) आणि मार्गदर्शक (टूर गाईड) म्हणून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल.
आदरातिथ्य प्रशिक्षण ‘स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी’ यांच्या सहकार्याने तर मार्गदर्शक प्रशिक्षण ‘भारतीय पर्यटन आणि यात्रा प्रबंध संस्थान, ग्वाल्हेर’ यांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना पर्यटन संचालनालयाकडून प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि अधिकृत परवाना प्रदान केला जाईल, ज्यामुळे त्यांना पर्यटन क्षेत्रात व्यावसायिक संधी मिळतील.
पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, पहिल्या टप्प्यात जागतिक वारसास्थळ यादीत समावेश झालेले रायगड, प्रतापगड, शिवनेरी व साल्हेर या किल्ल्यांच्या ठिकाणी नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे तसेच आगामी काळात राज्यातील ७५ पर्यटनस्थळी नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. या पर्यटन सुविधा केंद्रामध्ये शिशु कक्ष, दिव्यांगांकरीता विशेष सुविधा, वृद्धांकरिता सुविधा केंद्र, डिजिटल प्लॅटफॉर्म त्यामध्ये अनुभव कक्ष, बहुभाषिक सहाय्य व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री मोदी यांनी जपलेल्या तत्वाप्रमाणे सर्व नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र दिव्यांग सुलभ व सर्व समावेशक तसेच महिला, मुले व जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सोयी उपलब्ध करुन देणारे असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.