बीड : शहरी व ग्रामीण भागातील जनतेला पायाभूत सुविधांबरोबरच आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक कॅथलॅबमुळे गोरगरीब रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदारपणे उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. कॅथलॅबसाठी आवश्यकता भासल्यास अधिकचा निधी मंजूर करू,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १८ कोटी ७२ लक्ष रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅबचे लोकार्पण श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार संदीप क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, आरोग्य सेवेच्या उपसंचालक डॉ.रेखा गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या उपस्थित सर्वांना शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या मिळाव्यात यासाठी आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे.प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. प्रत्येक ठिकाणी नर्सिंग कॉलेज बरोबरच पॅरामेडिकल स्टाफ,नर्सेस,वैद्यकीय अधिकारीही उपलब्ध करून देण्यात येत आहे.अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे आशिया खंडातील पहिले महाविद्यालय असून या महाविद्यालयाच्या अद्यावतीकरणसाठी मुख्य आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले आहे.या कामासाठी ११०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.त्याचबरोबर बीड येथील जिल्हा रुग्णालयात नर्सिंग महाविद्यालयासाठी इमारत,मुलींच्या वसतिगृहासाठीही पोलीस विभागाच्या जागेची पाहणी करण्यात आली असून यासाठी १ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या आरोग्य सुविधांची कामे येत्या काळात पूर्ण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील,यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही देखील उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी दिली.
श्री.पवार पुढे म्हणाले की,जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असल्याचे सांगत अहिल्यानगर-बीड या रेल्वेचा शुभारंभ आज करण्यात येत आहे.या प्रवासासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी ही रेल्वे विद्युत व्यवस्थेवर चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.भविष्यात ही सेवा पुणे आणि मुंबईपर्यंत घेऊन जात वाहतूक सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील,यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत क्रीडा संकुलात खेळाडू,नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.लवकरच या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे.जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी विमानतळ उभारणीसाठी जागेचे सर्व्हेक्षण करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी कोनशीलेचे अनावरण करून व फीत कापून कार्डियाक कॅथलॅबचे लोकार्पण केले.तसेच संपूर्ण कॅथलॅबची पाहणी करून त्याठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.या कार्यक्रमाला पदाधिकारी, अधिकारी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
असे आहे कार्डियाक कॅथलॅब…
सर्वसामान्यांच्यादृष्टीने महत्वपूर्ण अशा कॅथलॅबमध्ये २४ तास कार्यरत कार्डिओलॉजीस्ट व भूलतज्ञ व डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. कॅथलॅबमध्ये अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लासटी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कॅथलॅबमध्ये १० बेडचे सुसज्य आय.सी.यू.असून कार्डियाक इको कार्डियोग्राफीची सोय करण्यात आली आहे.सुसज्य असे शस्त्रक्रिया गृह तयार करण्यात आलेले असून भविष्यात याच ठिकाणी ओपण हार्ट सर्जरीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.