पुणे : महाराष्ट्रात गेली तीन ते चार वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचा आदेश दिल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी मैदानात उतरायचे ठरवले आहे.
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढल्याने खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या हातातून सत्ता निसटली होती. आता पुन्हा त्या मतदारसंघात वर्चस्व मिळवण्यासाठी अजितदादा ॲक्टिव्ह झाले आहेत.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘जनसंवाद’ आणि ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. यात अजित पवार स्वतः उपस्थित राहून अधिकारी आणि नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन संघटना मजबूत करण्यावर भर देत आहेत.
हडपसर, पिंपरी-चिंचवडमध्ये या कार्यक्रमांना प्रतिसाद मिळाल्यानंतर आता खडकवासला मतदारसंघात दुप्पट ताकदीने पदाधिकारी रस्त्यावर उतरले असून गुलाबी रंगाचे फलक लावून वातावरण गुलाबी-गुलाबी झाले आहे. माजी महापौर दत्ता धनकवडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, विधानसभा अध्यक्ष प्रदीप धुमाळ व निरीक्षक अक्रूर शेठ कुदळे या नेत्यांनी नियोजनात पुढाकार घेतला आहे.
भाजपनेही आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, अजित पवारांनी स्वतः ग्राउंडवर उतरल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील सामना अधिक रंगतदार होणार असल्याचं बोललं जात आहे.