मुंबई : हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) च्या अमृतमहोत्सवानिमित्त २० वे रिजनल कन्व्हेन्शन ताज लँड्स एंड, वांद्रे येथे पार पडले. दोन दिवसीय रिजनल कन्व्हेन्शन पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. दोन दिवसीय रिजनल कन्व्हेन्शनमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.या कन्व्हेन्शन कार्यक्रमाला पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून, पर्यटनाला अधिक चालना मिळावी, या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडले. महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला जागतिक ओळख मिळण्यासाठी कन्व्हेन्शनमध्ये झालेला संवाद मोलाचा ठरला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे म्हणाले, पर्यटन क्षेत्राला अधिक चालना मिळावी, म्हणून महाराष्ट्र पर्यटन एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक दर्जा मिळावा, म्हणून आम्ही आदरातिथ्य क्षेत्राला आमच्याबरोबर काम करण्याचे आमंत्रण देत आहोत.
महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले की, ब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनाऱ्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील पाच समुद्र किनाऱ्यांचा, यात डहाणूमधील पारनाका, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व नागाव, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर यांचा समावेश झाला आहे. सिंधुदुर्गमध्ये पाण्याखालील पर्यटन प्रकल्पाचेही अनावरण करण्यात आले आहे. निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदारचे पाण्याखाली संग्रहालय आणि कृत्रिम बेट तयार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
या रिजनल कन्व्हेन्शनमध्ये पर्यटन संचालनालयाच्या वतीनेसहाय्यक संचालक सुशील पवार व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. एचआरएडब्ल्यूआय अध्यक्ष जिमी शॉ यांनी सांगितले की, १९५१ मध्ये असोसिएशनची स्थापना झाली. असोसिएशनने पश्चिम भारतात आपले स्थान अधिक बळकट केले. या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पर्यटन उद्योगाला अधिक चालना आणि बळकटपणा देण्यासाठी प्रयत्न करू.यावेळी अभिनेते व दिग्दर्शक बोमन ईराणी यांनी असोसिएशनच्या माजी अध्यक्षांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला.