सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडताहेत, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
  • केवायसीला गावात नेटवर्क नाही, 'लाडक्या बहिणींना' सातपुड्याचा डोंगर चढून घ्यावा लागतोय सिग्नलचा शोध, झाडांच्या फांद्यांवर फोन अडकवतात
  • कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद! कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार मास्टरमाईंड निघाला
 जिल्हा

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू

डिजिटल पुणे    14-10-2025 10:40:36

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियानास दोन वर्षात मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२५-२६ मध्ये हे अभियान राबविण्यासाठी ८६.७३ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सुधारित निकष आणि नवीन उपक्रमांसह या अभियानाचा तिसरा टप्पा राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.२०२५-२६ या वर्षाकरीता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राबविताना या अभियानाच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

यावर्षीही अभियानासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. २०२५-२६ या वर्षामध्ये सदर अभियान सुधारित निकषांसह राबविण्याच्या अनुषंगाने सर्व संचालकांशी समन्वय साधून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याबाबत आयुक्त (शिक्षण) यांना कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने २०२५-२६ या वर्षाकरीता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा-३ अभियान राबविण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त (शिक्षण) यांच्यामार्फत २९ ऑगस्ट २०२५ रोजी शासनास प्राप्त झाला आहे. या प्रस्तावावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून हे अभियान नवीन उपक्रमांसह राज्यभरात राबविण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ३० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ९५ टक्के शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.

२०२४-२५ मध्ये देखील ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा-२ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह २६ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये २९ जुलै २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. १८ नोव्हेंबर २०२४ व ९ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पारितोषिकाची ७३.८२ कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सदर अभियानास २०२३-२४ प्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळाला.

आता २०२५-२६ या वर्षाकरिता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून सदर अभियान नवीन उपक्रमांसह राज्यभरात राबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती