मुंबई : राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवांचे समायोजन करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.निर्मल भवन येथे राज्य एड्स नियंत्रण कर्मचारी सेवा समायोजन कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस एड्स नियंत्रण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी तसेच कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यभर एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १,६०० कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. यातील बहुतांश कर्मचारी २५ ते ४० वयोगटातील असून त्यांना या क्षेत्रातील अनुभव आहे. भविष्यात एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अनुभवी मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता, या कर्मचाऱ्यांच्या सेवांचे समायोजन करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.